महत्वाच्या बातम्या

 युवकांना रोजगार देण्यासाठी नियोजन करा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर


- वर्धा जिल्ह्यात २९ सप्टेंबरला एकाच दिवशी ११ ठिकाणी रोजगार महाकुंभ; नामांकित कंपन्यांचा सहभाग वाढविण्याचे निर्देश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील पदवीधर व पदव्युत्तर युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी ११ ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्यांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करून त्यांच्या उपलब्ध रिक्त पदांवर जिल्ह्यातील युवकांची निवड कशी करता येईल, याचे प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार महाकुंभ मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर बोलत होते. जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगार महाकुंभ ही मोठी संधी असून, या संधीचा जास्तीत जास्त युवक-युवतींना लाभ मिळवून देण्यासाठी व्यापक जनजागृती करावी. तसेच मोठ्या संख्येने उमेदवार मेळाव्यात सहभागी होतील, यासाठी आवश्यक नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मेळाव्यात सहभागी होणाऱ्या कंपन्यांसाठी स्वतंत्र दालनांची व्यवस्था करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. कंपन्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाच उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभव यानुसार त्यांना योग्य रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सुधाकर झळके तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय गाते उपस्थित होते.

या ११ ठिकाणी होणार रोजगार महाकुंभ -
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एकाच दिवशी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये अनेकांत स्वाध्याय मंदिर, वर्धा; कला, वाणिज्य महाविद्यालय, आर्वी; आर. व्ही. परणकर अभियांत्रिकी तथा तंत्रज्ञान महाविद्यालय, आर्वी; लोकमान्य महाविद्यालय, आष्टी; मॉडेल हायस्कूल, कारंजा; हरदयाल औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुलगाव; रामदास तडस अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवळी; रा. सु. बिडकर महाविद्यालय, हिंगणघाट; लघु उद्योग भारती, हिंगणघाट; विद्या विकास महाविद्यालय, समुद्रपूर; तसेच डॉ. आर. जी. भोयर महाविद्यालय, सेलू या ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व केंद्रांवर विविध कंपन्या व आस्थापनांना सहभागी करून घेण्यात येणार असून, रोजगाराच्या उपलब्ध संधी उमेदवारांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शैक्षणिक पात्रता, कौशल्य व अनुभवानुसार रोजगाराची संधी -
रोजगार महाकुंभ मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभवाचा विचार करून त्यांना योग्य रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासोबतच रोजगारासाठी आवश्यक मार्गदर्शनही उमेदवारांना मेळाव्यातून मिळणार आहे. त्यामुळे पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या तसेच विविध कौशल्ये आणि अनुभव असलेल्या युवक-युवतींसाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे.

नोंदणी केल्यानंतरच सहभाग -
रोजगार महाकुंभ मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक युवक-युवतींनी गुगल लिंकद्वारे पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतरच मेळाव्यात सहभागी होण्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळेत नोंदणी करून या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्काचे आवाहन -
रोजगार महाकुंभ मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, सिव्हिल लाइन, वर्धा येथे संपर्क साधावा, असे आवाहन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सुधाकर झळके यांनी केले आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी ११ ठिकाणी होणाऱ्या या रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा असून, नामांकित कंपन्यांना सहभागी करून घेऊन जास्तीत जास्त रिक्त पदांवर उमेदवारांची निवड करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.





  Print






Related Photos