नाचणगावात ४३ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


- पत्नी माहेरी गेल्याने घरात होता एकटाच; तुकडोजी चौक परिसरातील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : घरात कुणीही नसताना एका ४३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नाचणगाव येथील तुकडोजी चौक परिसरात उघडकीस आली. दीपक विठ्ठल इंगळे (वय ४३) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक इंगळे हे बांधकाम क्षेत्रात मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, त्यांना दारूचे व्यसन होते. दारूच्या सवयीमुळे ते नेहमी चिडचिड करीत असत, तसेच सतत कोणत्या ना कोणत्या विवंचनेत असल्याचे त्यांच्या भावाने सांगितले.
दरम्यान, मागील १५ दिवसांपासून दीपक यांची पत्नी माहेरी गेली होती. त्यामुळे ते घरी एकटेच राहत होते. अशातच २५ ऑक्टोबर रोजी घरात कुणीही नसताना त्यांनी घराच्या स्लॅबला असलेल्या कडीला पाळण्याच्या नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
दीपक यांच्या मृत्यूची माहिती मिळताच संबंधित पोलिसांनी घटनेची नोंद घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दीपक यांच्या पश्चात कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.




Petrol Price




