न्यायालयाच्या आदेशानंतर सेवानिवृत्त ठाणेदाराविरुद्ध मारहाणीचा गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपुूर : ट्रॅव्हल्स बसचालकाला रस्त्यात अडवून कथित शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्याविरुद्ध ब्रह्मपुरी पोलिसांनी १८ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादी मोहन शालीकराम अडिवकर ४२ यांच्या तक्रारीनुसार, २६ नोव्हेंबर २०२३ रोजी रेल्वे फाटकाजवळ त्यांच्या ट्रॅव्हल्स बसला आंभोरे यांनी अडविले.
यावेळी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच वाहतूक पोलिसाकडून लाठी घेऊन डोक्यावर वार केल्याने आपण जखमी झाल्याचे अडिवकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. जखमी अवस्थेत रुग्णालयात जाण्याऐवजी बस चालवत पोलीस ठाण्यात जाण्यास भाग पाडल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
घटनेदरम्यान मोबाईलमध्ये असलेले रेकॉर्डिंग व छायाचित्रे डिलीट करण्यात आल्याचा आरोपही अडिवकर यांनी केला आहे. पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेण्यात आली नसल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करून न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर ब्रह्मपुरी पोलिसांनी सुधाकर आंभोरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९४, ३२४, ३४१, ५०४ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १४५(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास PSI रेवणसिद्ध कदम करीत आहेत.




Petrol Price




