गडचिराेली : स्वस्तात दुचाकी वाहन खरेदी करून देण्याचे आमिष दाखवत शेकडो लोकांना गंडा


- दोन आरोपींना अटक, मुख्य आरोपी अद्याप फरार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिराेली :
शोरूम विक्री किमतीपेक्षा १० ते १२ हजार रुपयांनी स्वस्तात दुचाकी वाहन खरेदी करून देण्याचे आमिष दाखवत शेकडो लोकांना गंडा लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेला मुख्य आरोपी मात्र अद्याप फरार आहे. या प्रकरणाची व्याप्ती गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांतही आल्याची माहिती असून शेकडो लोकांना यात कोट्यवधी रुपयांचा गंडा लागल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 
लाॅकडाऊन काळात ग्रामीण भागातील नागरिकांना नवीन दुचाकी वाहनावर मोठी सूट मिळवून देण्याचे आमिष दाखवत गडचिरोली येथील आरोपी शुभम मडावी याने आपले एजंट गडचिरोली जिल्ह्यासह गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांत पसरविले होते. ही सवलत मिळवण्यासाठी दुचाकीची किंमत राेख स्वरूपात भरावी लागेल, अशी अट टाकली. कमी किमतीत वाहन मिळत असल्याने अनेकजण त्या आमिषाला बळी पडले. पैशांची जुळवाजुळव करीत नागरिकांनी प्रतिवाहन ६० ते ६२ हजार रुपये 'त्या' एजंटकडे माेठ्या विश्वासाने जमा केले. सोबत एजंटने सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड आणि पॅनकार्डही दिले. विशेष म्हणजे त्यांना काही दिवसांतच नवीन दुचाकी वाहनसुद्धा मिळाले. त्यामुळे नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास बसून अनेकजण हे स्वस्त वाहन घेण्यासाठी सरसावले. वास्तविक त्या एजंटांनी संबंधित दुचाकीधारकांकडून रोख स्वरूपात वसूल केलेले पैसे स्वत:कडे ठेवून त्यांच्या खोट्या सह्यांनी खोटे करारपत्र तयार केले आणि काही खासगी संस्थांकडून दुचाकी वाहनासाठी कर्ज घेतले. त्याच कर्जातून त्यांना परस्पर वाहन खरेदी करून दिले. कर्जवसुलीसाठी त्या संस्थांचा माणूस घरी आल्यानंतर दुचाकीधारकांना या फसवणुकीची जाणीव झाली. या सर्व व्यवहारांत कर्ज देणाऱ्या संस्थांनीही ज्यांच्या नावाने कर्ज देत आहे त्या वाहनधारकांची शहानिशा, सह्यांची पडताळणी केली नाही. त्यामुळे त्या संस्थांमधील काही व्यक्तींचा या फसवणुकीत हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी आतापर्यंत गडचिरोली, कुरखेडा येथे व त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी माेरगाव तालुक्यातील नागरिकांनीही फसवणूक झाल्याचे सांगत तक्रार दिली. गडचिरोली पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम मडावी आणि सहआरोपी षडानंद तोमटी यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४०६, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. यातील षडानंद तोमटी (१८) आणि गोंदिया जिल्ह्यातील कोरंभीटोला येथील टिकाराम राऊत (२२) यांना अटक करण्यात आली आहे.अधिक तपास गडचिरोली पोलीस करीत आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2021-08-29
Related Photos