नऊ गावांत एकच गणराया : एक गाव, एक गणपतीतून एकजुटीचा संदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या ग्रामीण हद्दीत ‘एक गाव, एक गणपती’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण हद्दीतील तब्बल नऊ गावांनी पुढाकार घेत एकाच ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. या उपक्रमामुळे गावागावांत सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सामूहिक सहभागाचे वातावरण निर्माण झाले आहे.
केम तुकूम, मोहाळी तुकूम, कोर्टी मक्ता (नवीन), कोर्टी मक्ता (जुनी), कोर्टी तुकूम, इटोली, कारवा, आसेगाव आणि गिलबिली या नऊ गावांचा एक गाव, एक गणपती उपक्रमात समावेश आहे. विविध गणेश मंडळांऐवजी ग्रामस्थांनी एकत्र येत एकाच ठिकाणी गणरायाची स्थापना केल्याने गणेशोत्सवाला यंदा सामूहिक स्वरूप प्राप्त झाले आहे.
या उपक्रमासाठी बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेंद्र वन्नकर, पोलीस अंमलदार रुपेश टोंगे आणि महिला पोलीस अंमलदार प्रज्ञा कांबळे यांनी ग्रामीण भागात पुढाकार घेत जनजागृती केली. गावातील नागरिकांशी संवाद साधून एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
बल्लारपूर शहरात एकूण ७४ गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या ग्रामीण हद्दीत एकूण ४४ गणपती विराजमान झाले आहेत. त्यापैकी विसापूर येथे सात गणपतींची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामीण भागातही गणेशोत्सवाचा उत्साह असून, धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
एक गाव, एक गणपतीच्या माध्यमातून गणेशोत्सवाला केवळ धार्मिक उत्सव न ठेवता सामाजिक एकजुटीचे व्यासपीठ मिळाले आहे. गावातील नागरिकांनी एकत्र येऊन घेतलेला हा निर्णय परस्पर सहकार्य आणि शांततेचा संदेश देणारा ठरत आहे. गणेशोत्सव काळात शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




Petrol Price




