महत्वाच्या बातम्या

 सिरोंचातील वीज समस्यांवर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा


- रखडलेले १३२ KV उपकेंद्र, कमी दाबाचा वीजपुरवठा, शेतकऱ्यांच्या समस्या व स्मार्ट मीटरचा मुद्दा मांडला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (MSEDCL) चे मुख्य अभियंता गजीबीये साहेब, अधीक्षक अभियंता खंडिलकर साहेब व कार्यकारी अभियंता वाघमारे साहेब यांनी आज सिरोंचा तालुक्याचा दौरा केला. यावेळी सिरोंचा येथील ३३/११ KV उपकेंद्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन तालुक्यातील विविध वीज समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी नगरसेवक रंजित गागापुरवार, नगरसेवक इम्तियाज खान, सामाजिक कार्यकर्ते सिद्दिक भाई, सुजल कमलवार, संदीप गंटा व सुजित मदरबोईना यांनी सिरोंचा तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या व गेल्या दोन-तीन वर्षांपासून रखडलेल्या १३२ KV विद्युत प्रकल्पाच्या कामाला गती देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडली.

सिरोंचा तालुक्यात अनेक भागांत नागरिकांना कमी दाबाच्या वीजपुरवठ्याचा (Low Voltage) सामना करावा लागत असून, त्याचा घरगुती ग्राहकांसह व्यावसायिक व विशेषतः शेतकऱ्यांच्या कृषिपंपांवर मोठा परिणाम होत आहे. वारंवार निर्माण होणाऱ्या वीज समस्यांमुळे शेतीच्या कामात अडथळे येत असल्याने विद्युत पुरवठा अधिक सक्षम व सुरळीत करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला स्मार्ट मीटरचा विषयही चर्चेत मांडण्यात आला. स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, नागरिकांच्या शंका व अडचणींचा विचार करूनच यासंदर्भात निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यासह सिरोंचा तालुक्यातील वीजपुरवठ्यातील सातत्य, तांत्रिक अडचणी, शेतकऱ्यांना होणारा त्रास आणि विद्युत पायाभूत सुविधा बळकट करण्यासंदर्भातील विविध प्रश्नांवर अधिकाऱ्यांसोबत सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.

चर्चेदरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मांडण्यात आलेल्या समस्यांची गंभीरतेने दखल घेऊन संबंधित प्रश्नांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ही चर्चा समाधानकारक झाल्याची माहिती नगरसेवक रंजित गागापुरवार यांनी दिली.

सिरोंचा तालुक्यातील वीज समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी १३२ KV प्रकल्पाचे रखडलेले काम तातडीने मार्गी लागणे अत्यंत आवश्यक आहे. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सर्व प्रश्न ठामपणे मांडले असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

- रंजित गागापुरवार, नगरसेवक, नगरपंचायत सिरोंचा





  Print






Related Photos