गडचांदूरमध्ये ४२ हजारांचा गांजा जप्त : महिलेला अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपुर : गडचांदूर शहरातील भंडारी कॉलनी परिसरात विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला गांजा पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. या कारवाईत नमिता विवेकानंद बिस्वास (वय ३७), रा. भंडारी कॉलनी, वॉर्ड क्र. ४, गडचांदूर) हिला पोलिसांनी अटक केले. तिच्याकडून एकूण ८४६ ग्रॅम गांजा सदृश अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत ४२ हजार ३०० रुपये आहे.
पोलिस उपनिरीक्षक गणेश अनभुले यांना १५ सप्टेंबर रोजी गडचांदूर येथे एका महिलेने गांजा विक्रीसाठी आणल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले.
पोलिस पथकाने छापा टाकून भंडारी कॉलनीतील संशयित महिलेच्या घराची झडती घेतली. यावेळी बेडरूममधील पलंगाखाली ठेवलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीत प्लास्टिकच्या थैलीमध्ये गांजा सदृश हिरवट पाने, फुले व बोंडे आढळून आले. गांजा सदृश अंमली पदार्थाचे वजन ८४६ ग्रॅम भरले.
या प्रकरणी नमिता विवेकानंद बिस्वास हिच्याविरुद्ध गडचांदूर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क) व २०(ब)(ii)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गडचांदूर पोलिस करीत आहेत.
सदर कारवाई गडचांदुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार शिवाजी कदम यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश अनभुले, पोउपनि पंकज हेकाड, मपोउपनि राधिका गायकवाड, पोहवा शितल बोरकर, पोअं सुरज ढोले, प्रकाश बाजगीर, मनोहर जाधव, साईनाथ उपरे, मपोअं सरीता येरगुडे यांनी केले.




Petrol Price




