ओवीच्या निरोगी हास्याने भारावले आमदार जोरगेवार


- दीड वर्षांपूर्वी हृदयात छिद्र आढळलेल्या चिमुकलीवर मुंबईत दोन वेळा निःशुल्क शस्त्रक्रिया; आरोग्य शिबिरात नियमित तपासणीदरम्यान आमदारांची घेतली भेट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : दीड वर्षांपूर्वी अवघ्या एका दिवसाची असताना आरोग्य शिबिरात तपासणीसाठी आलेल्या ओवी अडबाले या चिमुकलीच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले. या गंभीर आजाराची माहिती समोर आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. मात्र, तिच्या उपचारासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेत कुटुंबाला आधार दिला. मुंबई येथील ज्युपिटर रुग्णालयात ओवीवर दोन वेळा निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारानंतर आता ओवी पूर्णतः निरोगी झाली असून, तिचे निरागस हास्य पाहून आमदार जोरगेवार भावूक झाले.
दीड वर्षांपूर्वी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ओवी आपल्या आई-वडिलांसोबत आली होती. त्यावेळी ती अवघ्या एका दिवसाची होती. नियमित आरोग्य तपासणीदरम्यान तिच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले. चिमुकल्या मुलीच्या हृदयासंबंधीची ही गंभीर बाब समोर आल्यानंतर तिच्या आई-वडिलांसाठी हा मोठा धक्का होता. उपचाराचा खर्च आणि पुढील वैद्यकीय प्रक्रिया यामुळे कुटुंबीय चिंतेत होते.
ही बाब आमदार किशोर जोरगेवार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ओवीच्या उपचारासाठी तातडीने पुढाकार घेतला. कुटुंबीयांना आवश्यक आधार देत तिला मुंबई येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे ओवीवर दोन वेळा निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिची नियमित तपासणी आणि उपचार सुरू ठेवण्यात आले.
उपचारांना मिळालेल्या यशामुळे आता ओवी पूर्णतः निरोगी झाली आहे. चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ती नियमित तपासणीसाठी आली होती. याच वेळी तिची आमदार किशोर जोरगेवार यांच्याशी भेट झाली. दीड वर्षांपूर्वी उपचारासाठी आलेली चिमुकली आज निरोगी, खेळकर आणि हसतमुख अवस्थेत पाहून आमदार जोरगेवार यांना मोठा आनंद झाला.
ओवीच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य पाहताना तिच्या उपचारासाठी केलेल्या प्रयत्नांचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून आले. एका चिमुकलीला गंभीर आजारातून बाहेर काढून तिला पुन्हा निरोगी आयुष्य जगताना पाहणे हा अत्यंत आनंदाचा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. एखाद्या चिमुकल्याला आजारातून बाहेर काढून त्याला निरोगी आणि आनंदी पाहणे, यापेक्षा मोठे समाधान नाही. ओवीच्या चेहऱ्यावरील आजचे हसू हीच आपल्या आरोग्यसेवेच्या प्रयत्नांची खरी पावती आहे, अशी भावना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
आरोग्य शिबिरातून आजाराचे वेळीच निदान झाल्यानंतर पुढील उपचारांसाठी मिळालेल्या मदतीमुळे ओवीला नवजीवन मिळाले. दीड वर्षांपूर्वी चिंतेत असलेले तिचे कुटुंब आज चिमुकलीच्या निरोगी आणि हसतमुख चेहऱ्याकडे पाहून समाधान व्यक्त करत आहे.




Petrol Price




