कुनघाडा येथे मोबाइल शॉपी फोडून चोरट्यांचा डल्ला


- मोबाइल, रोख रक्कम आणि इतर साहित्य लंपास; श्वानपथक व ठसेतज्ज्ञांकडून तपास
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : तालुक्यातील कुनघाडा रै. येथे चोरट्यांनी मोबाइल शॉपीचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला आणि मोबाइलसह रोख रक्कम व इतर साहित्य लंपास केल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. मुख्य रस्त्यालगत आणि मंदिराजवळच असलेल्या दुकानात चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
कुनघाडा रै येथील मुख्य रस्त्यालगत मंदिराजवळ चिराग सुखचंद्र कोठारे यांची मोबाइल शॉपी आहे. रात्रीच्या वेळी दुकान बंद असताना चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास दुकानाला लक्ष्य केले. चोरट्यांनी शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील मोबाइल, रोख रक्कम तसेच इतर साहित्य चोरून नेले.
सकाळी दुकानात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही बाब परिसरात पसरली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. चोरीचा नेमका मुद्देमाल आणि त्याची एकूण किंमत याबाबतची माहिती पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण केले. तसेच ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे ठसे व संभाव्य पुरावे संकलित केले. त्यामुळे या चोरीचा लवकरच छडा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, घटनेप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. चोरट्यांची संख्या किती होती, चोरीला गेलेल्या मोबाइल व साहित्याचे नेमके प्रमाण किती आहे, तसेच रोख रक्कम किती लंपास झाली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मुख्य रस्त्यालगत असलेल्या दुकानात चोरी झाल्याने कुनघाडा परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे.




Petrol Price




