महत्वाच्या बातम्या

 वनभूमीवरील अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे द्या : शहर विकास आघाडीचे निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील रवींद्र नगर, मौलाना आझाद नगर, राजेंद्र प्रसाद नगर आणि पंडित दीनदयाल नगर परिसरातील सुमारे २० हजार नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून वनभूमीवरील घरांमध्ये वास्तव्य करीत आहेत. मात्र, अद्यापही त्यांच्या जमिनीचा अधिकृत पट्टा झालेला नसल्याने विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे शहर विकास आघाडीने म्हटले आहे.

सर्वे क्रमांक ३१/१ मधील वनभूमीवर १९८० पासून नागरिकांचे वास्तव्य असल्याचे आघाडीचे म्हणणे आहे. जमिनीचा पट्टा उपलब्ध नसल्यामुळे मागासवर्गीय कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना घरबांधणीसाठी बँकांकडून गृहकर्ज मिळत नसल्याचीही समस्या आहे. पट्टा नसल्याने जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येत नाहीत, तर जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक रहिवासी पुरावा म्हणून महसुली दस्तऐवज मिळविण्यातही अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रश्नासाठी शहर विकास आघाडीचे अध्यक्ष तथा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत थुलकर यांनी यापूर्वीही विविध आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, वनभूमीवरील अतिक्रमणधारकांना अद्याप जमिनीचे पट्टे मिळाले नसल्याने हा प्रश्न कायम असल्याचे आघाडीने म्हटले आहे. दरम्यान, झुडपी जंगल जमिनीवरील रहिवाशांना पट्टे देण्याबाबत राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आल्याचा संदर्भ देत, बल्लारपूरमधील पात्र नागरिकांच्या प्रकरणांवर तातडीने कार्यवाही सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात भारत थुलकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले.

वनभूमीवरील दीर्घकाळच्या वास्तव्यास कायदेशीर स्वरूप देऊन पात्र अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावेत, तसेच त्यांना घरकुल, गृहकर्ज आणि अन्य शासकीय सुविधांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक महसुली कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. शिष्टमंडळात धर्मेंद्र गायकवाड, वाजीद खान, अशोक पाटील, आसीफ शेख, शरद वानखेडे, सरफराज शेख, सम्राट थुलकर, नरेंद्र हिरे, रवि वनकर आदी उपस्थित होते.





  Print






Related Photos