महत्वाच्या बातम्या

 ८ वर्षापासून पोलिसांना देत होता हुलकावणी : अखेर फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : पोलिसांना गुंगारा देत तब्बल आठ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गडचिरोली येथून ताब्यात घेतले. प्रशांत ऊर्फ पिंटू शशिकांत मिस्त्री ऊर्फ मंडल ३८ वर्षे रा. गडचिरोली असे या आरोपीचे नाव असून, दारूबंदीच्या काळात दाखल झालेल्या गुन्ह्यात तो पोलिसांना पाहिजे होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

सन २०१८ मध्ये नागभीड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) व ८३ अंतर्गत अप. क्र. ८०/२०१८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात प्रशांत मिस्त्री याचा सहभाग असल्याच्या अनुषंगाने तो पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. तब्बल आठ वर्षे तो फरार असल्याने त्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

दरम्यान, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी गडचिरोली येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने हालचाली करीत गडचिरोली येथे शोध घेतला. अखेर पोलिसांनी प्रशांत मिस्त्री याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी नागभीड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली ब्रह्मपुरी उपविभागीय पथकाने केली. अनेक वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शोधून ताब्यात घेतल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले आहे.





  Print






Related Photos