सालमारा परिसरात वन्य प्राण्यांकडून धान पिकाचे नुकसान : पंचनामा करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : वनपरीक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सालमारा व लगतच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून रानडुक्कर, हरीण आणि नीलगाय या वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या धान पिकाचे मोठे नुकसान होत आहे. सध्या धान पीक कापणीच्या ऐन टप्प्यावर आले असतानाच रात्रीच्या वेळी वन्य प्राणी शेतात घुसून पिकांची नासधूस करत आहेत. हातातोंडाशी आलेला घास प्राण्यांच्या प्रादुर्भावामुळे हिरावला जात असल्याने परिसरातील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
या वाढत्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर वनविभाग आणि महसूल प्रशासनाने संयुक्तपणे बाधित शेतांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत व नियमानुसार योग्य ती भरपाई मंजूर करावी, अशी मागणी सालमारा येथील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच शेतीचे अधिक नुकसान टाळण्यासाठी परिसरात रात्रीच्या वेळी वनविभागाची गस्त वाढवून वन्य प्राण्यांचा वावर रोखण्यासाठी योग्य व प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षाही स्थानिक गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.




Petrol Price




