दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी तक्रार निवारण दिन


- नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित तक्रारींचे जिल्हास्तरावर होणार निराकरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे विहित वेळेत आणि योग्य पद्धतीने निराकरण करण्यासाठी सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण होण्यास मदत होणार असून, नागरिकांची अनावश्यक धावपळही कमी होणार आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित नागरिकांच्या तक्रारी जिल्हा स्तरावर, विभागीय स्तरावर तसेच नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडे प्राप्त होत असतात. जिल्हा व विभागीय स्तरावर तक्रारींचे वेळेत निराकरण न झाल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारींचा ओघ वाढतो. परिणामी, तक्रारदारांना वारंवार कार्यालयात जावे लागते आणि प्रशासकीय कामकाजावरही त्याचा परिणाम होतो.
ही बाब लक्षात घेऊन नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत व प्रभावीपणे निराकरण व्हावे, यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी तक्रार निवारण दिन आयोजित करण्याचे निर्देश नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिले आहेत. त्यानुसार भंडारा येथील सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित तक्रार असलेल्या नागरिकांनी निर्धारित वेळेत उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, भंडारा अनिल तु. कपले यांनी केले आहे.




Petrol Price




