जिल्हाधिका-यांच्या हस्ते तंबाखुमुक्त युवा अभियानाचा शुभारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : युवकांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी करणे, मुखाचा कर्करोग व इतर तंबाखूजन्य आजारांना प्रतिबंध करणे तसेच निरोगी आणि व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूमुक्त युवा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते आज २ करण्यात आला.
भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली, तंबाखुमुक्त युवा अभियान ४.० अंतर्गत शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत प्रबोधन, शाळा व महाविद्यालयांमध्ये तंबाखूमुक्त परिसर निर्माण करणे, कोटपा कायदा, २००३ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास प्रतिबंध आणि अल्पवयीनांना तंबाखू विक्रीवरील बंदीबाबत जनजागृती, रॅली, प्रभातफेरी, चित्रकला, निबंध स्पर्धा आणि तंबाखूमुक्तीची शपथ, तसेच तंबाखू सोडण्यासाठी समुपदेशन व आरोग्यविषयक मदत हे उपक्रम राबविण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, तरुण पिढीमध्ये तंबाखुजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. आपली युवा पिढी व्यसनांच्या आहारी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. शाळा, महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विक्रीस बंदी असून, याबाबत नियमांचे उल्लंघन झाले तर संबंधितांवर कडक कारवाई करावी. वसतीगृह तसेच आश्रमशाळेसुध्दा नियमितपणे तपासणी करणे गरजेचे आहे. जनजागृतीपर संदेश देण्यासाठी मॅरेथॉनचे आयोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, दंत शल्य चिकित्सक डॉ. संदीप पिपरे, राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक डॉ. श्वेता सावलीकर, अन्न सुरक्षा अधिकारी कुणाल मुळे, प्रणय कांबळे, उपशिक्षणाधिकारी जी.बी. चवरे, पोलिस उपनिरीक्षक सुनील गौरकर आदी उपस्थित होते. विविध विभागाच्या वतीने करण्यात आलेली कार्यवाही : सिगारेट व इतर तंबाखुजन्य पदार्थ कायदा (कोटपा) अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत ३९६ जणांवर दंडात्मक कारवाई करून ३९ हजार ६०० रुपयांची वसुली करण्यात आली.
याच कालावधीत पोलिस विभागाच्या वतीने २४५९ जणांवर कारवाई तर ४ लक्ष ८५ हजार ६७७ रुपये दंड आकारण्यात आला. अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत सदर कालावधीत २७ लक्ष २९ हजार ४७७ रुपये किमतीचा १३३१ किग्रॅ साठा जप्त करण्यात आला. जिल्ह्यात सन २०२४-२५ मध्ये ३१४ शाळा तंबाखुमुक्त, सन २०२५-२६ मध्ये ३२२ शाळा तर एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत आतापर्यंत ६५ शाळा तंबाखुमुक्त करण्यात आल्या आहेत.




Petrol Price




