आजाद च्या नेतृत्वात अंगारा बचतगटांच्या महिलांचा मालेवाडा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा!

- आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक चैतन्य काटकर यांचे आश्वासन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा : अंगारा परिसरातील बचतगटांच्या महिला व त्यांच्या बँक खात्यांमध्ये कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून आज शेकडो महिलांनी आजाद समाज पार्टीच्या नेतृत्वाखाली मालेवाडा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला. यावेळी महिलांनी आपल्या खात्यांमधील संशयास्पद व्यवहार, बचतगटांच्या पैशांबाबत झालेला कथित गैरव्यवहार आणि कर्जाच्या नोंदींबाबतची व्यथा पोलिसांसमोर मांडली.
अंगारा परिसरातील जवळपास २५ बचतगट आणि शेकडो महिलांच्या बँक खात्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप महिलांनी केला आहे. तत्कालीन विदर्भ कोकण ग्रामीण बँक व आताची महाराष्ट्र ग्रामीण बँक अंतर्गत कार्यरत असलेल्या BC केंद्रामार्फत व्यवहार करताना महिलांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप यापूर्वी महिलांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर आज महिलांनी मोठ्या संख्येने मालेवाडा पोलीस ठाणे गाठले. प्रभारी पोलीस निरीक्षक चैतन्य काटकर यांनी महिलांची व्यथा प्रत्यक्ष ऐकून घेतली तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याचे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
महिलांच्या खात्यांची चौकशी करण्याची मागणी -
महिलांनी एकाच व्यवहारासाठी वारंवार अंगठा घेणे, अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम खात्यातून काढणे, बचतगटांच्या खात्यातील रक्कम इतरत्र वळविणे तसेच कर्ज फेडल्यानंतरही पुन्हा कर्ज दाखविणे, अशा गंभीर बाबी पोलिसांसमोर मांडल्या. गरीब व अशिक्षित महिलांच्या कष्टाच्या पैशांशी संबंधित हा विषय असल्याने संपूर्ण व्यवहारांची तपासणी करून सत्य समोर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आजाद समाज पार्टीने केली.
महिलांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करणार -
यावेळी आजाद समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्येक महिलेच्या खात्याची तपासणी करावी, अशी मागणी केली. तर जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी महिलांच्या कष्टाच्या पैशांचा प्रश्न असून दोषी कोणताही असो, चौकशीत दोष सिद्ध झाल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली.
पोलीस प्रशासनाने चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने महिलांनी आपली बाजू पोलिसांसमोर ठामपणे मांडली. चौकशीमध्ये दिरंगाई झाल्यास आजाद समाज पार्टीकडून पुढील आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित -
या धडक मोर्चात जिल्हा प्रभारी विनोद मडावी, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा उपाध्यक्ष चेतन काटेंगे, जिल्हा प्रवक्ते तुषार रामटेके, महासचिव अंकुश कोकोडे, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, कुरखेडा तालुकाध्यक्ष सावन चिकराम, तालुका उपाध्यक्ष पितांबर हर्रो, वडसा युवा अध्यक्ष मंगेश बन्सोड आणि प्रफुल रायपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व बचतगटांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या. आता पोलिसांच्या चौकशीत या प्रकरणाचे सत्य काय समोर येते आणि दोषींवर काय कारवाई होते, याकडे अंगारा परिसरातील शेकडो महिलांचे लक्ष लागले आहे.




Petrol Price




