किक बॉक्सिंग स्पर्धेत दिव्यानी तुपे हिचे जिल्ह्यात प्रथम स्थान : विभागीय स्पर्धेसाठी निवड

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बल्लारपूर येथे आयोजित जिल्हास्तरीय व महानगरपालिका स्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पीएम न.प. गांधी विद्यालयाची सहावीतील विद्यार्थिनी दिव्यानी तुपे हिने उल्लेखनीय कामगिरी करत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे तिची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. विविध शाळांमधील खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. या चुरशीच्या स्पर्धेत दिव्यानी हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळवून विद्यालयासह बल्लारपूर शहराचा नावलौकिक वाढविला.
दिव्यानीच्या या यशाबद्दल बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ, शिक्षण सभापती प्रियंका थुलकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन कडूकर, क्रीडा शिक्षक स्वप्निल डंभारे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. आगामी विभागीय स्पर्धेतही दिव्यानीने अशीच उत्कृष्ट कामगिरी करून यश संपादन करावे, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.




Petrol Price




