पलासपूर येथे उद्या भव्य सत्संग समारोह


- माजी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे व प्रणय खुणे यांचा जाहीर सत्कार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घोट : चामोर्शी तालुक्यातील रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील मौजा पलासपूर येथे अनुकूल ठाकूर सत्संग सेवा मंडळ, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने तालनवमी सप्ताहानिमित्त रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी भव्य सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारोहाला जिल्ह्यासह राज्य व परराज्यातील सत्संगी, भाविक आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या भव्य सत्संग समारोहानिमित्त दुपारी ३ ते सायंकाळी ७वाजेपर्यंत सत्संग व प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्य तसेच परराज्यातील आदरणीय सत्संगी व मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सत्संगातून भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. भक्तिमय वातावरणात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी आयोजकांकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे.
समारोहाचे औचित्य साधून अनुकूल ठाकूर सत्संग सेवा मंडळ, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार अशोक भाऊ नेते, गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद भाऊ नरोटे तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
सत्संग समारोहानंतर पलासपूर येथील कार्यक्रमस्थळी उपस्थित सर्व भक्तजन, मान्यवर व निमंत्रित पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक सलोखा आणि भक्तांमधील आपुलकी वाढविण्याच्या दृष्टीनेही या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या भव्य सत्संग समारोहास सर्व आमंत्रित व निमंत्रित पाहुणे, जिल्ह्यातील अनुकूल ठाकूर भक्त, मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने मौजा पलासपूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर पलाश भाऊ घरामी, पंकज सेठ घरामी तसेच अनुकूल ठाकूर सत्संग सेवा मंडळ, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.




Petrol Price




