महत्वाच्या बातम्या

 जागतिक सायकल दिनानिमित्त गडचिरोलीत भव्य सायकल रॅली : पुण्यातही गडचिरोलीच्या सायकलप्रेमींचा सहभाग


- आरोग्य, पर्यावरण आणि इंधन बचतीसाठी सायकलचा संदेश; सायकल स्नेही मंडळाचा उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल स्नेही मंडळ, गडचिरोली यांच्या वतीने बुधवार, ३ जून २०२६ रोजी शहरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्त जीवनशैली आणि आरोग्यदायी जीवनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गेल्या सात वर्षांपासून सायकल स्नेही मंडळ गडचिरोली जिल्ह्यात सायकल चालवा, पर्यावरण वाचवा आणि आरोग्यवान बना हा संदेश रुजविण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षीही जागतिक सायकल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळी ठीक ६.३० वाजता इंदिरा चौक येथून सायकल रॅलीला सुरुवात झाली. कारगिल चौक, आयटीआय चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा कार्यालय, इंदिरा गांधी चौक मार्गे वसंत विद्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये शहरातील नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, कर्मचारी आणि सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

यावेळी प्रा. विलास पारखी यांनी सायकल स्नेही मंडळाच्या कार्याचा आढावा घेत सायकल चालविण्याचे आरोग्यदायी, आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे उपस्थितांना सांगितले. 

जिल्हा सरचिटणीस सरचिटणीस उदय धकाते, सायकल चालवा, आरोग्यवान व्हा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा आणि इंधन बचतीसाठी सायकल हा सर्वोत्तम पर्याय हा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

या रॅलीत मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. विलास पारखी,जिल्हा सरचिटणीस सरचिटणीस उदय धकाते, उपाध्यक्ष उपेंद्र रोहनकर, महिला उपाध्यक्षा प्रा. सुनीता साळवे, मार्गदर्शक विलास निंबोरकर, प्रा. डॉ. योगेश पाटील, प्रा. डॉ. अनिल चहांदे, प्रा. ज्ञानेश्वर धकाते, प्रा. विजय कुतरमारे, प्राचार्य मनोज कवठे, प्रा. उल्हास आखाडे, सुचिता कांबळी, विजय साळवे, मुरलीधर दोनाडकर, अनिकेत शेगावकर, सोहम बोदलकर, आराध्य महाजन, पूर्व शेनमारे, सुनील देशमुख, राजेश चुर्हे, सुचिता उदय धकाते यांच्यासह अनेक सायकलप्रेमींनी सक्रिय सहभाग घेतला.

दरम्यान, मंडळाचे संघटक प्रा. अरुण पालारपवार हे पुणे येथे असतानाही त्यांनी गडचिरोली सायकल स्नेही मंडळाचे प्रतिनिधित्व करत तेथे स्वतंत्र सायकल रॅली आयोजित केली. सकाळी ६ वाजता केशवनगर, मुंढवा चौक, गुलमोहर कॉलनी, कोरेगाव पार्क, पंचशील चौक, मगरपट्टा, मुंढवा चौक मार्गे पुन्हा केशवनगर येथे सुमारे सव्वा सात वाजता रॅलीचा समारोप करण्यात आला. त्यामुळे गडचिरोलीच्या सायकल चळवळीचा संदेश पुणेकरांपर्यंतही पोहोचला.

ज्येष्ठ सायकलप्रेमी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी सायकल स्नेही मंडळाच्या सातत्यपूर्ण कार्याचे कौतुक करत पर्यावरण संरक्षण आणि आरोग्य संवर्धनासाठी मंडळाने उभारलेली जनचळवळ समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos