महत्वाच्या बातम्या

 आलापल्ली-सिरोंचा ३५३-सी राष्ट्रीय महामार्गावर मृत्यूचा सापळा : कन्सल्टंट, इंजिनिअर आणि ठेकेदाराच्या संगनमताने कोट्यवधींचा भ्रष्टाचार?


- राफ्ट एका जागी अन् वॉल दुसऱ्याच जागी! मानांकनाला केराची टोपली दाखवत निकृष्ट दर्जाच्या पुलांचे बांधकाम; भ्रष्ट कारभारावर जनतेचा तीव्र 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / आलापल्ली / सिरोंचा : आलापल्ली ते सिरोंचा या ३५३-सी राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आता तर ठेकेदार, कन्सल्टन्सी आणि संबंधित अभियंते (इंजिनिअर) यांच्या अभद्र युतीने निकृष्ट कामाचा कळस गाठला असून, हा महामार्ग सर्वसामान्य जनतेच्या जिवावर उठला आहे. महामार्गावरील पुलांचे (ब्रिज) बांधकाम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत चुकीच्या आणि निकृष्ट पद्धतीने सुरू असून, भविष्यात येथे मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकल्पात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मानांकनांची सरळ-सरळ पायमल्ली केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

तांत्रिक घोटाळा: राफ्ट एका जागी, वॉल दुसऱ्या जागी -
सध्या या महामार्गावरील पुलांच्या बांधकामाची जी स्थिती आहे, ती पाहिल्यास कोणताही सुज्ञ नागरिक थक्क होईल. पुलाचा पाया मजबूत करणारा राफ्ट (Raft) एका जागी टाकण्यात आला आहे, तर पुलाची मुख्य भिंत म्हणजेच वॉल (Wall) दुसऱ्याच जागी उभी केली जात आहे. तांत्रिकदृष्ट्या ही अत्यंत गंभीर आणि अक्षम्य चूक आहे. राफ्ट आणि वॉल यांच्यात एवढी मोठी तफावत असताना, या संरचनेला मंजुरी (Approval) कशी काय मिळाली? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कन्सल्टन्सी आणि इंजिनिअर यांनी कार्यालयात बसूनच या निकृष्ट कामाला ओके प्रमाणपत्र दिले की काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्ता संतोष ताटीकोंडावार यांनी उपस्थित केला आहे.

कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी आणि कामाचा दर्जा तपासण्यासाठी कोट्यवधी रुपये देऊन कन्सल्टन्सी ची नेमणूक केली जाते. तसेच सरकारी अभियंते त्यावर बारीक लक्ष ठेवून असतात. मात्र, ३५३-सी महामार्गाच्या बाबतीत कन्सल्टन्सी आणि अभियंत्यांनी आपले कर्तव्य विसरून कंत्राटदाराशी (ठेकेदार) आर्थिक हितसंबंध जोडल्याचे उघड दिसत आहे. मानांकन आणि डिझाईननुसार काम होत नसतानाही, कंत्राटदाराची बिले मंजूर करण्यासाठी या अधिकाऱ्यांनी डोळे झाकून अप्रूव्हल (Approval) दिले आहे.

 हा सरळ-सरळ जनतेच्या पैशांची लूट आणि भ्रष्टाचाराचा प्रकार आहे. असा आरोप ताटीकोंडावार यांनी केला आहे.पहिल्याच जोरदार पावसात या मार्गावरील तात्पुरते रस्ते आणि पूल वाहून गेल्याच्या घटना ताज्या आहेत. आता तर मुख्य पुलांचे बांधकामच इतके पोकळ आणि नियमबाह्य पद्धतीने केले जात आहे की, हे पूल जड वाहनांचा भार सहन करू शकतील का? याबाबत नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे. या निकृष्ट कामामुळे आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील हजारो प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. राफ्ट आणि वॉलच्या रचनेतील एवढी मोठी तांत्रिक तफावत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेस का आली नाही?जनतेच्या जिवाला धोका पोहोचवणाऱ्या या कंत्राटदाराची पाठराखण करणारे पांढरपेशी अभियंते कोण? असा सवालही नागरिक करत आहेत.

या महामार्गावरील भ्रष्ट कारभाराची पोलखोल झाल्यानंतर आता स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा अपव्यय करणाऱ्या कंत्राटदाराला तात्काळ ब्लॅक लिस्ट (काळ्या यादीत) टाकावे आणि भ्रष्ट अभियंत्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos