स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी टी-पॉइंट येथे स्कॉर्पिओ कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. मृत युवकाचे नाव लोमेश्वर हिवराज तिवाडे (वय ३०, रा. आवलगाव) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोमेश्वर तिवाडे हा आपल्या आई-वडिलांसोबत आवळगाव येथे राहत असून शेती व्यवसाय करीत होता. ८ मे रोजी तो आपल्या चुलत भावाची दुचाकी (क्र. एमएच ३४ सीक्यू ७२२६) घेऊन गांगलवाडी टी-पॉइंटवरून गावाकडे परतत होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ कारने (क्र. एमएच ११ एई ७१७१) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात लोमेश्वर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने ब्रम्हपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी मृतकाचे वडील हिवराज बाबुराव तिवाडे (वय ५३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगाव-वडसा येथील भूपेंद्र घनश्याम राजगिरे (वय २८) याच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये कलम १८४, १०६(१) आणि २८१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचा पुढील तपास पीएसआय बालाजी चौहान करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




