भंडारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे एका अडीच वर्षीय बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना लाखनी ते साकोली राष्ट्रीय महामार्गावरील मुंडीपार (सडक) जंगल शिवारात बुधवारी रात्री ११:२० वाजण्याच्या सुमारास घडली. माहिती नुसार, लाखनी वन परिक्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गावर मुंडीपार जवळील रॉयल ढाब्यालगत साकोलीहून भंडाऱ्याकडे जात असलेल्या एका अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या बिबट्याला जोरदार धडक दिली. यात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती वनरक्षक अजय उपाध्ये यांनी साकोली वनपरिक्षेत्र कार्यालयाला दिली.
घटनास्थळी साकोलीचे वन परिक्षेत्राधिकारी रोशन राठोड, लाखनीचे वन परिक्षेत्राधिकारी सुरेश गोखले, जांभळीचे बीटगार्ड, राउंड ऑफिसर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी भेट दिली. मोका पंचनामा करीत जांभळी नर्सरीमध्ये मृत बिबट्याला हलविण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सव्वासे यांनी शवविच्छेदन केले. मृत बिबट्या हा नर असून, त्याचे शरीरातील सर्व अवयव शाबूत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सीटचे प्रतिनिधी तसेच मानद वन्यजीवरक्षकही उपस्थित होते. जांभळी सहवन क्षेत्राचे वनकर्मचारी व वनविकास महामंडळाच्या वनकर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जांभळी नर्सरीतच मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंडरपासचे बांधकाम संथगतीने मुंडीपार ते जांभळी सडक या तीन कि.मी. मार्गावर मोहघाटा जंगल शिवारात अंडरपासचे बांधकाम होत आहे. तब्बल दोन वर्षांपासून हे बांधकाम अतिशय संथगतीने सुरू आहे. रस्ता ओलांडताना वन्य प्राण्यांची सुरक्षा हवी, त्यांच्या जिवाला धोका होऊ नये, यासाठी बांधकाम केले जात आहे. मात्र, हे बांधकाम केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न पुन्हा एकदा यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
News - Bhandara