महत्वाच्या बातम्या

 एल-निनोच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये : कृषी विभागाचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला एल-निनोचा प्रभाव आणि पावसाच्या वितरणातील संभाव्य अनिश्चितता लक्षात घेता, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केवळ एक-दोन पावसाच्या सरींवर पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. किमान ८० ते १०० मि.मी. समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अन्यथा दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

नुकतीच खरीप हंगाम आढावा बैठक पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत बियाणे, खत उपलब्धता, पीक कर्ज आणि विविध कृषी योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यंदा जिल्ह्यासाठी एकूण ४ लाख १८ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये कापूस पिकाचे सर्वाधिक २ लाख २४ हजार ९९६ हेक्टर क्षेत्र असून त्याखालोखाल  सोयाबीनचे १ लाख २४ हजार ५०० हेक्टर आणि तुर पिकाचे ६५ हजार ६१०  हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा देशात सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. एल-निनोमुळे मान्सून उशिरा सुरू होणे, पावसाच्या काळात मोठा खंड पडणे किंवा अचानक अतिवृष्टी होणे अशा समस्या उद्भवू शकतात. यामुळे पिकांची उगवण आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता जमिनीत पुरेसा ओलावा आल्यावरच पेरणी करावी.

बियाण्यांची घरगुती पद्धतीने उगवण क्षमता तपासावी आणि बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. पेरणीला उशीर झाल्यास बियाण्याचे प्रमाण २० ते २५ टक्क्यांनी वाढवावे. पाण्याचा ताण सहन करणाऱ्या आणि लवकर येणाऱ्या वाणांची निवड करावी. केवळ एक पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

जमीनीमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पिकांमध्ये आच्छादनाचा वापर करावा. वेळेवर कोळपणी करून पिकांना मातीची भर द्यावी. पावसाचा खंड पडल्यास जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी विरळणी करावी. पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी बीबीएफ किंवा सरी-वरंबा पद्धतीचा वापर करावा. शेततळ्यांच्या माध्यमातून पाणी साठवण्यावर भर द्यावा.

कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र आणि स्थानिक कृषी अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहूनच शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos