महत्वाच्या बातम्या

 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे : जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर


- २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन

- उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गुणगौरव

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : सक्षम लोकशाहीसाठी मतदारांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग महत्वाचा आहे. त्यानुषंगाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून जास्तीत जास्त मतदार नोंदणी करुन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी  मोहिमेचे स्वरुप द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी दिल्या.

राष्ट्रीय मतदार दिवसांच्या पूर्व नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात  नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली, यावेळी ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपविभागीय अधिकारी शेखर घाटगे, इंदिरा चौधरी, निवडणूक विभागाशी संबंधित अधिकारी व तहसीलदार राहुल सारंग यावेळी उपस्थित होते.  

बारावी ते पदवी या पाच वर्षाच्या अभ्यासक्रमातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून नवमतदारांसाठी नोंदणी अर्ज भरून घेण्यात यावे. जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्रचार्यांची बैठक घेऊन मतदार नोंदणीसाठी त्यांना प्रोत्साहित करावे. एम्स व इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी अर्ज भरण्याविषयी प्रवृत्त करण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी यावेळी दिल्या.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २५ जानेवारी रोजी राज्यासह देशभरामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. राज्यातील नागरीकांमध्ये मतदान नोंदणी तसेच मतदानाच्या महत्त्वासंदर्भात जागृकता निर्माण व्हावी म्हणून या दिवशी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाचा नागपूर जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम २५ जानेवारीला दुपारी २ ते ३  या वेळेत गुरुनानक ऑडिटोरीयम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ येथे आयोजित करण्यात येणार आहे.

कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, नायब तहसिलदार, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तसेच मतदार नोंदणी अधिकारी व ऑपरेटर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमास नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

  Print


News - Nagpur
Related Photos