महत्वाच्या बातम्या

 शाळेच्या आवारात सुरू होता जुगार : गोंडपिपरी पोलिसांनी धाड टाकत चार जणांना घेतले ताब्यात, दोघे फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील तारसा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गोंडपिपरी पोलिसांनी शनिवारी ४ जुलै रोजी दुपारी धाड टाकून चार जणांना ताब्यात घेतले, तर दोन जण पोलिसांना चकवा देत पसार झाले. कारवाईदरम्यान रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण २,१८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 प्राप्त माहितीनुसार, गोंडपिपरी पोलीसांना मुखबिरामार्फत तारसा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात काही व्यक्ती पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार तिथे धाड टाकली.

धाडीदरम्यान सहा जण पत्त्यांवर पैशांची बाजी लावून जुगार खेळताना आढळले. पोलिसांची चाहूल लागताच दोघेजण घटनास्थळावरून पसार झाले, तर चार जणांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये अभिजीत पत्रू गुडी (२५), राकेश निलकंठ शेंडे (२४), प्रकाश सोमा पाचभाई (५५) आणि अमोल सखाराम चिलनकर (२८) यांचा समावेश आहे. तर कुणाल जगन्नाथ केळझळकर (२७) व शिवम बंडू धानोरकर (२३) हे दोघे घटनास्थळावरून फरार झाले. सर्वजण तारसा खुर्द, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर येथील रहिवासी आहेत.

पोलिसांनी घटनास्थळावरून ५२ पत्त्यांचा संच, डावावरील रोख रक्कम तसेच आरोपींकडील रोख रक्कम मिळून २,१५० रुपये आणि पत्त्यांचा संच ३० रुपये, असा एकूण २,१८० रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला. घटनास्थळाचा पंचनामा करून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

या प्रकरणी गोंडपिपरी पोलीस ठाण्यात संबंधित सहा आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस चे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos