महत्वाच्या बातम्या

 लोखंडी कडे व पाइपने जीवघेणा हल्ला; बल्लारपुरात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी/बल्लारपूर :जुन्या वादाच्या कारणावरून एका युवकावर लोखंडी कडे व जर्मन धातूच्या पाइपने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना बल्लारपूर येथे घडली. या प्रकरणी बल्लारपूर पोलीसांनी दोन आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.प्राप्त माहितीनुसार, मोहसीन खान सईद खान (वय ३३), रा. संतोषी माता वार्ड, बल्लारपूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. १४ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांचा मित्र सोहेल खान व मिर शेख यांच्या मित्रामध्ये वाद झाला होता. त्यावेळी मोहसीन खान यांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. मात्र, याच कारणावरून मिर शेख याने “तू हमारे झगडे मे क्यो आया, अब तू मिल मैं तेरेको देख लेता” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.त्यानंतर दि. १५ मे रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास फॉरेस्ट डेपो येथील मैदानावर मोहसीन खान गेले असता, तेथे आधीपासून उपस्थित असलेल्या मिर शेख याने जुन्या वादाच्या कारणावरून अश्लील शिवीगाळ करत त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी उपस्थित मित्रांनी वाद सोडविला.यानंतर दोन्ही पक्ष तक्रार देण्यासाठी बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. पोलीसांनी वैद्यकीय तपासणीसाठी दोघांना सरकारी रुग्णालयात नेले असता, दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मिर शेख व त्याचा मित्र उदय पाटील यांनी मोहसीन खान यांच्यावर पुन्हा हल्ला केला. आरोपींनी लोखंडी कडे व जर्मन धातूच्या पाइपच्या तुकड्याने डोक्याच्या मागील भागावर, डाव्या कानाजवळ व डाव्या डोळ्याजवळ वार करून जखमी केल्याची तक्रार आहे. घटनास्थळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून पुढील अनर्थ टाळला.

या प्रकरणी बल्लारपूर पोलीसांनी आरोपी मिर शेख व उदय पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११५(२), ११८(१), २९६, ३५१(२), ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos