कोठारीत प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त : एलसीबीच्या कारवाईत ९८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू, गुटखा व पानमसाल्याच्या अवैध साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडक कारवाई करत ९८ हजार १३९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी बंडू रामदास पहानपट्टे (वय ५३), रा. कोठारी, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, कोठारी परिसरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, गुटखा व पानमसाल्याची साठवणूक करून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे २० मे रोजी एलसीबीच्या पथकाने कोठारी येथील बंडू रामदास पहानपट्टे यांच्या घर व दुकानावर छापा टाकला.
झडतीदरम्यान सात वेगवेगळ्या प्रकारचा सुगंधित तंबाखू, गुटखा व पानमसाल्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून संपूर्ण माल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची एकूण किंमत ९८ हजार १३९ रुपये असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी बंडू रामदास पहानपट्टे यांच्याविरुद्ध कोठारी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोलीस हवालदार किशोर वैरागडे, अजय बागेसर, पोलीस शिपाई गोपीनाथ नरोटे, चंद्रशेखर माथनकर तसेच चालक पोलीस शिपाई ऋषभ बारसिंगे यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




