महत्वाच्या बातम्या

 आरमोरी पोलिसांची अवैध दारू वाहतुकीवर कारवाई : ९२ हजारांच्या मुद्देमालासह दोन तस्करांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यातील अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात आरमोरी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून, या अंतर्गत काल, १४ जून रोजी जुना ठाणेगाव बसस्थानक परिसराजवळ सापळा रचून पोलिसांनी एका मोपेडसह ३२ हजार रुपयांची अवैध देशी दारू जप्त केली आहे. या कारवाईत एकूण ९२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुन्ना रमेश बांगरे (२६, रा. सूर्योदय वार्ड, पोर्ला, ता. जि. गडचिरोली) आणि प्रशिक घनश्याम नागरे (२४, रा. आकापूर, ता. आरमोरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

आरमोरी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने जुना ठाणेगाव बस स्टँड परिसरापासून ५ किमी अंतरावर दक्षिणेकडे सापळा रचला होता. दरम्यान, सुझुकी ॲक्सेस १२५ मोपेड (क्र. MH-३३-AH-७०७७) वरून दोघे जण संशयास्पदरीत्या येताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून तपासणी केली असता, त्यांच्याकडे असलेल्या हिरव्या रंगाच्या थैलीमध्ये रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीच्या ९० एम.एल. क्षमतेच्या ४०० सीलबंद निपा आढळून आल्या. पोलिसांनी ३२ हजार रुपये किमतीची दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली ६० हजार रुपये किमतीची मोपेड, असा एकूण ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

या प्रकरणी आरोपींविरुद्ध आरमोरी पोलीस ठाण्यात अप. क्र. २२०/२०२६, कलम ६५(अ), ९८(२), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे करीत आहेत. सदर यशस्वी कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोपाल राज, आणि सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिर्डे (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरीचे पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या नेतृत्वात पोउपनि नरेश सहारे, पोलीस शिपाई सुरेश झाडे, पोलीस काँस्टेबल लकी मामुलकर, पोलीस काँस्टेबल सारटे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos