भद्रावती पोलिसांची धडक कारवाई : ८.३६ लाखांचा विदेशी दारूसाठा जप्त, चालक फरार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : अवैध विदेशी दारूच्या वाहतुकीवर भद्रावती पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ८ लाख ३६ हजार ७६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत विदेशी दारूने भरलेली मारुती सुझुकी स्विफ्ट ZDI क्रं. एमएच ०४ एचएफ १२०८ ही कार ताब्यात घेण्यात आली असून वाहनचालक मात्र पोलिसांना चकवा देत पसार झाला आहे. याप्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७१०/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरहून चंद्रपूरच्या दिशेने एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी भद्रावती टप्प्यावर पहाटे नाकाबंदी केली. दरम्यान, संशयित वाहन तेथून जात असताना चालकाने पोलिसांना पाहताच वाहन न थांबविता भरधाव वेगाने चंद्रपूरच्या दिशेने पळ काढला.
यानंतर पोलिसांनी तत्काळ वाहनाचा पाठलाग सुरू केला. पाठलागादरम्यान चालकाने मौजा घोडपेठ गावातील वस्तीच्या दिशेने वाहन वळवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. काही अंतरानंतर वाहन नजरेआड झाल्याने पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबविली. अखेर मौजा घोडपेठ येथील शंकर हेअर सलूनसमोर सदर स्विफ्ट कार बेवारस अवस्थेत उभी आढळून आली. वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला होता.
पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये ऑफिसर चॉईस विदेशी दारूच्या १८० मिलीच्या १,७२८ निप्पा किंमत २ लाख ९५ हजार ४८८ रुपये आणि ९० मिलीच्या ४८० निप्पा किंमत ४१ हजार २८० रुपये असा मोठा साठा आढळून आला. तसेच ५ लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार असा एकूण ८ लाख ३६ हजार ७६८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी पोलीस हवालदार देवानंद डुकरे यांच्या फिर्यादीवरून भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अवैध दारू पुरवठ्यामागील मुख्य सूत्रधार आणि फरार वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी तपास करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, गजानन तुपकर, सहाय्यक फौजदार महेंद्र बेसरकर, पोलीस हवालदार अनुप आस्टूनकर, देवानंद डुकरे, गोपाल आतकुलवार तसेच पोलीस अंमलदार खुशाल कावळे, योगेश घाटोळे आणि संतोष राठोड यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




