अवर्षणामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी संकटात; जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून तातडीने आर्थिक मदत द्यावी : सुनील नंदनवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असून जिल्ह्यातील शेतकरी गंभीर आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अनेक भागांत धानाचे पऱ्हे, तूर, तीळ तसेच इतर खरीप पिके करपू लागली असून पावसाअभावी पिकांची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आरमोरी विधानसभा क्षेत्र सहअध्यक्ष सुनील नंदनवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
सुनील नंदनवार यांनी म्हटले आहे की, यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने शेतीची मशागत, बी-बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि पेरणीवर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र, समाधानकारक पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे काही भागांत दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली असून आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त खर्चाचा बोजा पडणार आहे.
सध्या जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून दररोज आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र, पावसाने साथ न दिल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. अवर्षणामुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिकांची सद्यस्थिती आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याचे तातडीने पंचनामे करावेत. तसेच जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नंदनवार यांनी केली आहे.
याशिवाय दुबार पेरणीसाठी विशेष अनुदान, पीक कर्जाचे पुनर्गठन, कर्जावरील व्याजमाफी तसेच आवश्यक कृषी निविष्ठा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी शासनाकडे केली आहे. शासनाने या गंभीर परिस्थितीकडे संवेदनशीलतेने पाहून तातडीने निर्णय घेतला नाही, तर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान अधिक वाढण्याची भीती असल्याचेही त्यांनी नमूद केले.
News - Gadchiroli




Petrol Price




