शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत अभ्यासक्रम अर्धवट सोडू नये


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : शासन निर्णयानुसार विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतला आहे, तो अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्ती ही पुर्ण अभ्यासक्रमाकरीता मंजूर करण्यात येत असते. त्यामुळे शिष्यवृत्तीस पात्र असलेल्या विद्यार्थ्यानी अर्धवट अभ्यासक्रम सोडू नये. तसेच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना याबाबत सुचना द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरवर्षी १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात. प्रवेश मिळेपर्यंत किंवा गॅप वर्षाचा कालावधी वाया जाऊ नये म्हणून अनेक विद्यार्थी तात्पुरत्या स्वरूपात बीए, बीएससी, बीकॉम किंवा डिप्लोमा यांसारख्या बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात.
शिष्यवृत्ती गमावण्याचा धोका : विद्यार्थ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात घेतलेल्या बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जर महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचा अर्ज केला, तर तांत्रिक नियमांमुळे भविष्यात त्यांना निवडलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा लाभ मिळणे बंद होऊ शकते.
विद्यार्थ्यांसाठी सल्ला : जर विद्यार्थ्यांनी भविष्यात व्यावसायिक अभ्यासक्रमाला जाण्याचा मानस ठेवला असेल, तर त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात घेतलेल्या बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा पर्याय निवडू नये. अशा स्थितीत विद्यार्थ्याने संबंधित अभ्यासक्रमाचे शुल्क स्वतः भरणे हिताचे राहील.
परताव्याबाबत स्पष्टीकरण : जर एखाद्या विद्यार्थ्याने यापूर्वीच शिष्यवृत्तीचा लाभ घेतला असेल, तर ती रक्कम चलानद्वारे शासनाला परत करण्याचे कोणतेही वित्तीय नियम प्रचलित नाहीत. त्यामुळे कोणत्याही अनधिकृत सूचनेवरून किंवा मार्गदर्शनावरून पैसे परत करू नयेत.
सर्व संबंधित महाविद्यालयांनी या बाबीची नोंद घ्यावी आणि प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे योग्य समुपदेशन करावे. महाविद्यालयाच्या मुख्य सूचना फलकावर आणि डिजिटल ग्रुप्सवर याबाबतची माहिती ठळकपणे प्रदर्शित करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक किंवा आर्थिक नुकसान होणार नाही.
याबाबतच्या सुचना सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्या असून विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाच्या शिष्यवृत्ती शाखा व समान संधी केंद्राकडे संपर्क साधावा,असे समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.
News - Wardha




Petrol Price




