चंद्रपुरात रक्तरंजित हल्ला : दगडाने ठेचून युवकाचा खून


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मित्रनगर परिसरात गुरुवारी रात्री एका युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करून तपासाला वेग दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत युवकाची ओळख संतोष अरुण भेंडे रा. पाला, जि. अमरावती अशी झाली आहे. संतोष भेंडे हे मित्रनगर परिसरातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. आरोपीने दगडाने वार करून संतोष यांना गंभीर जखमी केले. हल्ला इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर आरोपी तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले व रामनगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी प्रभावती एकूरके यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, हत्येतील आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून विविध दिशांनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपासानंतरच घटनेचा उलगडा होणार आहे.
News - Chandrapur




Petrol Price




