कोडशी बु. येथे ६ ऑक्टोबरला विशेष ग्रामसभा

- सरपंचांविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावर अनुसमर्थन घेण्यासाठी आयोजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील मौजा कोडशी बु. ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश गजानन कोल्हे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या व २२ सप्टेंबर २०२६ रोजी तीन-चतुर्थांश मताने संमत झालेल्या अविश्वास प्रस्तावाच्या अनुषंगाने ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालय, कोडशी बु. येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी, यांच्या २३ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी, कोरपना यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष ग्रामसभा होणार असून, अविश्वास प्रस्तावावर ग्रामसभा सदस्यांचे अनुसमर्थन घेणे, हा या सभेचा एकमेव विषय राहणार आहे. विशेष ग्रामसभेसाठी प्रचलित नियमानुसार आवश्यक गणपूर्ती असणे बंधनकारक राहील.
ग्रामसभेत उपस्थित सदस्यांची अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने आणि विरोधात अशा दोन गटांत शिरगणना करण्यात येईल. उपस्थित ग्रामसभा सदस्यांच्या साध्या बहुमताने प्रस्तावाला अनुसमर्थन मिळाल्यास अविश्वास प्रस्ताव संमत झाल्याचे समजण्यात येईल. तर उपस्थित सदस्यांच्या साध्या बहुमताने प्रस्ताव फेटाळण्यात आल्यास सरपंच पद कायम राहील.
या प्रक्रियेसाठी १ ऑक्टोबर २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित व २९ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली विधानसभा मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार पात्र ग्रामसभा सदस्यांचा सहभाग नोंदविण्यात येईल. विशेष ग्रामसभा केवळ अविश्वास प्रस्तावावरील अनुसमर्थनासाठी आयोजित करण्यात आली असल्याने या सभेत अन्य कोणत्याही विषयावर चर्चा केली जाणार नाही.
मतदारांनी ओळखपत्र सोबत आणावे : कोडशी बु. ग्रामपंचायत क्षेत्रातील संबंधित ग्रामसभा सदस्यांनी ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहावे. सभेस येताना मतदारांनी राज्य निवडणूक आयोगाने विहित केलेल्या ओळख पुराव्यांपैकी कोणताही वैध ओळख पुरावा सोबत बाळगणे आवश्यक आहे, असे कोरपनाचे उपविभागीय अधिकारी बालाजी कदम यांनी कळविले आहे.




Petrol Price




