महत्वाच्या बातम्या

 कापूस पिकावर दहिया रोगाचा प्रादुर्भाव : शेतकऱ्यांनी तातडीने व्यवस्थापन करावे


- देवळी तालुक्यातील मुरदगाव (बेलसरे) येथे रोगाची लक्षणे आढळली; उत्पादन घटण्याची शक्यता, कृषी शास्त्रज्ञांचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : दिवसाचे उष्ण तापमान आणि रात्रीच्या वेळी जाणवणारा गारवा यामुळे वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम कापूस पिकावर दिसून येत आहे. जिल्ह्यातील काही भागांत कापूस पिकावर दहिया रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असून, देवळी तालुक्यातील मुरदगाव (बेलसरे) येथील कापूस पिकावरही या रोगाची लक्षणे दिसून आली आहेत. या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास पानगळ, पात्या व फुलांची गळ तसेच अपरिपक्व बोंडांचे नुकसान होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाचे नियमित निरीक्षण करून रोगाची लक्षणे दिसताच योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.

पानांवर पांढरे ठिपके; प्रादुर्भाव वाढल्यास पानगळ -
दहिया रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो. या रोगाची सुरुवातीची लक्षणे कापसाच्या पानांवर दिसून येतात. पानांवर दही शिंपडल्याप्रमाणे पांढरे ठिपके निर्माण होतात. पानांच्या खालच्या बाजूला भुरकट-पांढरे चट्टे, तर वरील बाजूला तांबूस पट्टे दिसून येतात.

रोगाचा प्रादुर्भाव वाढत गेल्यास संपूर्ण पानाच्या खालच्या बाजूने वरच्या बाजूपर्यंत भुरकट-पांढरे थर दिसू लागतात. परिणामी पाने सुकून गळून पडतात. पानांच्या कडा आतील बाजूला वळतात किंवा पानांचा कोकडा होतो. याचा परिणाम झाडाच्या वाढीवर आणि खोडाच्या विकासावर होऊन मालधारणा कमी होऊ शकते.

रोगाचा प्रादुर्भाव तीव्र झाल्यास पाने, पात्या, फुले आणि अपरिपक्व बोंडे गळून पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कापूस उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत उपाययोजना करणे आवश्यक आहे.

सौम्य प्रादुर्भावासाठी गंधकाची फवारणी -
दहिया रोगाचे नियंत्रण करण्यासाठी सर्वप्रथम रोगग्रस्त पिकांचे अवशेष जाळून नष्ट करावेत. पिकाला शिफारशीपेक्षा जास्त नत्रयुक्त खत देणे टाळावे. तसेच रोगाचा प्रादुर्भाव दिसत असताना फवारणीद्वारे नत्र देऊ नये, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. रोगाचा सौम्य प्रादुर्भाव आढळल्यास पाण्यात मिसळणारे गंधक २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी सकाळी किंवा दुपारनंतर करावी.

जास्त प्रादुर्भाव झाल्यास शिफारशीत बुरशीनाशकांचा वापर -
कापूस पिकावर दहिया रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळल्यास पुढीलपैकी शिफारशीत बुरशीनाशकांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अँझोक्झिस्ट्राँबीन १८.२ टक्के + डिफेनकोनॅझोल ११.४ टक्के एस.सी. : १० मिली प्रति १० लिटर पाणी.क्रेसोक्झिम मिथाईल ४४.३ टक्के एस.सी. १० मिली प्रति १० लिटर पाणी  फवारणी करताना उत्पादनाच्या लेबलवरील सूचना, योग्य मात्रा, सुरक्षित वापर आणि प्रतीक्षा कालावधी यांचे पालन करावे. शेतातील रोगाची तीव्रता व पिकाची स्थिती लक्षात घेऊन कृषी अधिकारी किंवा कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणेही महत्त्वाचे आहे.

नियमित निरीक्षण करून वेळीच उपाययोजना करा -
वातावरणातील बदलांमुळे कापूस पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी नियमितपणे पानांची तपासणी करावी. रोगाची लक्षणे आढळल्यास विलंब न करता योग्य व्यवस्थापन करावे. प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि शिफारशीनुसार फवारणी केल्यास पिकाचे संभाव्य नुकसान कमी करण्यास मदत होऊ शकते.

पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी जागरूक राहून दहिया रोगाचे वेळीच व्यवस्थापन करावे, असे आवाहन पीक संरक्षण विषय विशेषज्ञ डॉ. निलेश वझिरे आणि कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी केले आहे.





  Print






Related Photos