रेकॉर्डवरील दुचाकी चोराच्या एलसीबी ने आवळल्या मुसक्या : २.३० लाखांच्या चार दुचाकी हस्तगत, पाच चोरीचे गुन्हे उघड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील संशयित दुचाकी चोराला ताब्यात घेत त्याच्याकडून तब्बल २ लाख ३० हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत. आरोपीच्या चौकशीत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेले एकूण पाच दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. प्रतिक धनराज झाडे (३३), रा. महाकाली वॉर्ड, चंद्रपूर असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील असून, तो दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
आरोपीच्या ताब्यात TVS कंपनीची मोटारसायकल क्रमांक MH-34-BU-5217 आढळून आली. पोलिसांनी या वाहनाची माहिती तपासली असता ते पडोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपराध क्रमांक २९१/२०२६, कलम ३०३(२), भारतीय न्याय संहिता अंतर्गत नोंदविलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी केली. चौकशीत त्याने दुचाकी चोरीच्या आणखी घटनांची माहिती दिली. आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे दुध डेअरी कॉलनी, चंद्रपूर परिसरातील झाडी-जंगलासह इतर ठिकाणांहून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. हस्तगत करण्यात आलेल्या वाहनांमध्ये TVS मोटारसायकल MH-34-BU-5217 (किंमत ४० हजार रुपये), होंडा ॲक्टिव्हा मोपेड MH-34-CA-4413 (किंमत ५० हजार रुपये), होंडा ॲक्टिव्हा मोपेड MH-31-FL-7928 (किंमत ८० हजार रुपये) आणि हिरो स्प्लेंडर प्लस MH-34-AG-6839 (किंमत ६० हजार रुपये) यांचा समावेश आहे.
यापैकी होंडा ॲक्टिव्हा MH-34-CA-4413 ही रामनगर पोलीस ठाण्यातील अपराध क्रमांक ७३९/२०२६, तर MH-31-FL-7928 ही ॲक्टिव्हा बर्डी पोलीस ठाणे, नागपूर येथील अपराध क्रमांक ५०६/२०२६ मधील चोरीची असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, आरोपीने बल्लारशाह पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेली पॅशन प्रो मोटारसायकल माणिकगड, राजुरा परिसरात बेवारस अवस्थेत सोडून दिल्याचेही तपासात निष्पन्न झाले. सदर मोटारसायकल पोलिसांनी यापूर्वीच जप्त केली आहे. त्यामुळे या कारवाईत एकूण पाच दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार दुचाकी, एकूण किंमत २ लाख ३० हजार रुपये, हस्तगत केल्या आहेत. आरोपीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाई व तपासासाठी पडोली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. दुचाकी चोरीच्या आणखी घटनांमध्ये त्याचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात उपविभाग चंद्रपूर पथक यांनी केले.




Petrol Price




