पेन्शन अदालतीत निवृत्तीवेतन धारकांच्या अडचणींचे निवारण


- निवृत्तीवेतन प्रकरणे तयार करण्याबाबत मार्गदर्शन : प्रक्रियेतील नवीन बदलांचीही दिली माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : निवृत्तीवेतनधारकांच्या विविध अडीअडचणींचे निवारण करण्यासोबतच निवृत्तीवेतन प्रकरणे तयार करताना येणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी महालेखाकार कार्यालय, नागपूर आणि जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे झालेल्या या अदालतीत निवृत्तीवेतनधारकांनी मांडलेल्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यात आले. तसेच पेन्शन प्रक्रियेत करण्यात आलेल्या नवीन बदलांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
या पेन्शन अदालतीस महालेखाकार कार्यालय, नागपूर येथील वरिष्ठ लेखा अधिकारी मैथिली जगन्नाथन, सहाय्यक लेखा अधिकारी गीतांजली घांगरेकर आणि लेखापाल प्रतापसिंग सिंगरौरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी निवृत्तीवेतन प्रक्रियेशी संबंधित विविध बाबींवर उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
अदालतीदरम्यान निवृत्तीवेतनधारकांनी आपल्या विविध अडीअडचणी व प्रलंबित बाबी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. त्याचबरोबर विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवृत्तीवेतन प्रकरणे तयार करताना येणाऱ्या अडचणी, आवश्यक कागदपत्रे तसेच प्रकरणांच्या कार्यवाहीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. महालेखाकार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संबंधित प्रश्नांची माहिती देत शंकांचे निरसन केले.
पेन्शन प्रक्रियेत झालेल्या नवीन बदलांबाबतही यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली. बदललेल्या प्रक्रियेनुसार निवृत्तीवेतन प्रकरणे तयार करताना कोणती कार्यवाही करावी, कोणत्या बाबींची दक्षता घ्यावी आणि प्रकरणांच्या कार्यवाहीत येणाऱ्या त्रुटी कशा टाळाव्यात, याबाबत उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
निवृत्तीवेतनधारक आणि निवृत्तीवेतन प्रकरणे हाताळणारे अधिकारी-कर्मचारी यांना महालेखाकार कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने पेन्शन अदालतीचा उपक्रम उपयुक्त ठरला. थेट चर्चेतून समस्या समजून घेणे आणि त्यावर मार्गदर्शन मिळाल्यामुळे प्रलंबित निवृत्तीवेतन प्रकरणांच्या कार्यवाहीस गती मिळण्यास मदत होणार आहे.
यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी धर्मराव पेंदाम, अपर कोषागार अधिकारी दीपक उके, उपलेखापाल भास्कर निंबेकर, लिपिक प्रवीण सोनवणे, माया मामिडवार, मयुरी दंडेवार यांच्यासह विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने निवृत्तीवेतनधारक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपकोषागार अधिकारी नरेश लोंढे यांनी केले.




Petrol Price




