महत्वाच्या बातम्या

 जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंद करा : अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशारा!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : आगामी जनगणना २०२७ मध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजासाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करून समाजाची जातनिहाय अचूक आकडेवारी नोंदवावी, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत थेरे यांनी केली. केंद्र सरकारने यासंदर्भात तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागातर्फे शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी ओबीसी हक की हुंकार या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला काँग्रेसचे ओबीसी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजितभाऊ वंजारी यांच्या प्रचाराची रणनीती आणि नियोजनावर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमात नागपूर विभागाचे राज्य समन्वयक मोरेश्वर भाडे यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम न ठेवणे ही मागासवर्गीय समाजाच्या हिताकडे दुर्लक्ष करणारी भूमिका असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी श्यामकांत थेरे म्हणाले की, भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त कार्यालयाने आगामी जनगणना २०२७ संदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश नसल्याने समाजाच्या हक्कांचा प्रश्न निर्माण झाला आहे. ओबीसी समाजाला शिक्षण, रोजगार आणि विविध कल्याणकारी योजनांमध्ये योग्य प्रतिनिधित्व व हक्काचा वाटा मिळवून देण्यासाठी जातनिहाय अचूक आकडेवारी आवश्यक आहे. त्यामुळे जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंद होणे गरजेचे आहे.

केंद्र सरकारने अधिसूचनेत तातडीने दुरुस्ती करून ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा. अन्यथा या मागणीसाठी रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष केला जाईल, असा इशारा थेरे यांनी दिला. या बैठकीत महाराष्ट्रातील सद्यस्थितीतील दुष्काळाच्या परिस्थितीवरही चर्चा करण्यात आली. दुष्काळग्रस्त भागातील समस्या आणि त्यावरील उपाययोजनांबाबत उपस्थितांनी आपली मते मांडली.

कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन वैद्य, जिल्हा ओबीसी काँग्रेस अध्यक्ष श्यामकांत थेरे, शहर जिल्हा ओबीसी काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक राहुल चौधरी, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद अहिरकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष अनिल नरुले, माजी महापौर तथा नगरसेविका संगीता अमृतकर, नगरसेविका वैशाली महाडोळे, नगरसेवक अजय बल्की, अजय महाडोळे, अतुल पिंपळकर, उदय धोबे, प्रणय धोबे, सोनू पिदूरकर, गणपत खुडे, चंदू माथने, भगवती पिदूरकर, अंकुश चौधरी आणि अतुल ठाकरे यांच्यासह शेकडो ओबीसी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्यामकांत थेरे आणि राहुल चौधरी यांच्या वतीने करण्यात आले. गोपाल अमृतकर यांनी संचालन केले, तर अजय बल्की यांनी आभार मानले.





  Print






Related Photos