महत्वाच्या बातम्या

 मुलगी शिकली, तर भविष्य घडले : जिवतीत मुलींच्या हक्कांसाठी जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / चंद्रपूर : मुलींना शिक्षणाची समान संधी, सुरक्षित वातावरण आणि संरक्षण मिळाल्यास त्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो, याबाबत जनजागृती करण्यासाठी पंचायत समिती जिवती येथे बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांच्या अध्यक्षतेखाली २४ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला.

जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सखी वन स्टॉप सेंटर आणि चाईल्ड हेल्पलाईन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात किशोरवयीन मुलींचा मानसिक विकास, शिक्षणाचे महत्त्व, सुरक्षितता आणि मुलींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी लिंगभेदाला आळा घालणे, मुलींना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे, मानसिक विकासासोबत आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे याबाबत माहिती देण्यात आली. तसेच बाल संरक्षण यंत्रणेची रचना, प्रमुख कायदे, शासनाच्या विविध योजना आणि समाजाच्या विकासात मुला-मुलींची भूमिका यावरही मार्गदर्शन करण्यात आले.

चाईल्ड हेल्पलाईन १०९८ ही ० ते १८ वर्षे वयोगटातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी २४ तास कार्यरत असलेली यंत्रणा असल्याची माहिती देण्यात आली. सखी वन स्टॉप सेंटरच्या सुविधा, बाल संगोपन योजना, बालकामगार व बालमजुरी प्रतिबंध, बालविवाह प्रतिबंध, दत्तक प्रक्रिया तसेच अनाथ प्रमाणपत्राबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला संरक्षण अधिकारी प्रदीप भोंगळे, अंगणवाडी सुपरवायझर कुलमेथे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा मडावी, चाईल्ड हेल्पलाईन सुपरवायझर कल्पना फुलझेले, सखी वन स्टॉप सेंटरच्या पॅरा लीगल प्रीती खातखेडे यांच्यासह जिवती तालुक्यातील मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. मुलींचे शिक्षण, संरक्षण, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी समाजाने पुढाकार घेण्याचे आवाहन या कार्यक्रमातून करण्यात आले.





  Print






Related Photos