आश्रमशाळा शिक्षकांचा काळ्या फिती लावून निषेध : दुसरीकडे जि.प.च्या १३ शिक्षकांचा गुणगौरव


- गडचिरोली प्रकल्पातील शिक्षकांवर बळजबरीचा आरोप; अन्यायकारक धोरण थांबविण्याची मागणी, तीव्र आंदोलनाचा इशारा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शिक्षक दिनानिमित्त एका बाजूला जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १३ शिक्षकांचा जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला, तर दुसरीकडे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत कार्यरत आश्रमशाळेतील शिक्षकांनी काळ्या फिती लावून प्रशासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. त्यामुळे शिक्षक दिनीच जिल्ह्यात शिक्षकांच्या प्रश्नांचा विरोधाभास समोर आला.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांना शनिवार, रविवार तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी रात्रपाळीसाठी उपस्थित राहण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेने केला आहे. या कथित अन्यायकारक धोरणाविरोधात संघटनेच्या आवाहनानुसार ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी आश्रमशाळांतील शिक्षकांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला.
गडचिरोलीसह कळवण, नाशिक, शहापूर तसेच राज्यातील इतर आदिवासी विकास प्रकल्पांमध्ये शिक्षकांवर होत असलेल्या कथित अन्यायाच्या विरोधात सीटू संलग्नित आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेने आंदोलनाची पहिली पायरी म्हणून काळ्या फिती लावून निषेध करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचा दावा संघटनेने केला आहे.
अधीक्षकांचा प्रभार शिक्षकांकडे देण्यास विरोध -
आश्रमशाळा संहितेनुसार अधीक्षक व अधीक्षिका यांनी त्यांच्या प्रभाराची जबाबदारी एकमेकांकडे सोपविणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात शिक्षकांकडे प्रभार दिला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या नावाखाली शिक्षकांना रात्रपाळी लावून पहारेकऱ्याची जबाबदारी दिली जात असल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे. यामुळे शिक्षकांच्या सेवाशर्ती आणि कामाच्या तासांचे उल्लंघन होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. तसेच महिला शिक्षकांच्या बाबतीत महिला हक्क, विशाखा समितीच्या मार्गदर्शक तत्त्वे आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. शिक्षकांच्या कौटुंबिक जीवनावर, आरोग्यावर आणि पुरेशा विश्रांतीवरही या अतिरिक्त जबाबदाऱ्यांचा विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रात्रीच्या देखरेखीवरही आक्षेप -
आश्रमशाळांमध्ये शिक्षक व शिक्षिकांवर रात्री व्हिडिओच्या माध्यमातून देखरेख ठेवली जात असल्याने त्यांच्या गोपनीयतेचा आणि सन्मानाचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. आश्रमशाळेत एखादी अप्रिय घटना घडल्यास दोषारोप सिद्ध होण्यापूर्वीच शिक्षक, मुख्याध्यापक किंवा अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई केली जात असल्याचेही संघटनेने म्हटले आहे. महिला शिक्षकांना रात्री नियमबाह्य काम करण्याची सक्ती केली जात असल्याचा गंभीर आरोपही संघटनेने केला आहे. या सर्व कथित अन्यायकारक कारवाया आणि दडपशाहीविरोधात आश्रमशाळेतील शिक्षक एकवटले असून प्रशासनाने शिक्षकांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असा इशारा संघटनेने दिला आहे.
सोशल मीडियावरही संताप -
राज्यातील आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेच्या व्हॉट्सअॅप ग्रुप तसेच सोशल मीडियावर प्रकल्प प्रशासनाच्या धोरणाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. शिक्षकांची प्रतिमा मलीन करून आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास कसा साध्य होणार, असा सवालही संघटनेने उपस्थित केला आहे. आदिवासी विकास विभागाच्या वतीने शिक्षक दिनी आश्रमशाळेतील शिक्षकांचा सत्कार होण्याऐवजी शिक्षकांनाच काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्याची वेळ येणे ही दुर्दैवी बाब आहे. प्रशासनाने या प्रश्नाची वेळीच दखल घेऊन शिक्षकांवरील नियमबाह्य व अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त भार थांबवावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. अन्यायकारक धोरण आणि नियमबाह्य कामे थांबविण्यात आली नाहीत, तर यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे राज्य सरचिटणीस बी. टी. भामरे यांनी दिला आहे.
जि. प.च्या १३ शिक्षकांचा गुणगौरव -
दरम्यान, शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १३ शिक्षकांना ‘जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. ५ सप्टेंबर रोजी सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून डायटचे प्राचार्य धनंजय चापले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रेरक उजगरे, उपशिक्षणाधिकारी संजीव पारसेवार, वेतन पथक अधीक्षक विवेक नाकाडे, भामरागडचे गटशिक्षणाधिकारी गणेश पाटील आदी उपस्थित होते.
प्राथमिक गटातील १२, तर माध्यमिक गटातील एका शिक्षकाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. प्राथमिक गटात समय्या सद्दी, अनिरुध्द केंद्रे, ममता इंदुरकर, जानकीराम पुलगमकर, मोडकु नागोसे, श्रीनिवास पुलुरवार, शैलजा गोरेकर, वर्षा नाकाडे, संजय लोणारे, अर्चना सांगोळकर, प्रशांत ठेंगरे आणि राजेंद्र भुरसे यांचा समावेश आहे. माध्यमिक गटातून रवि नारनवरे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन विषय शिक्षक सुरेश वासलवार यांनी केले. शिक्षणाधिकारी प्रेरक उजगरे यांनी प्रास्ताविक केले, तर सहायक प्रशासन अधिकारी धनंजय दुम्पेटीवार यांनी आभार मानले. उपशिक्षणाधिकारी अमरसिंह गेडाम, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र सहाळा, अविनाश झिलपे, अक्षय राऊत, खेमचंद उंदिरवाडे आणि देवानंद समर्थ यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांच्या चिकित्सक वृत्तीला वाव द्या : सुहास गाडे -
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत टिकले पाहिजे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्यांच्या चिकित्सक वृत्तीला आणि विचार करण्याच्या क्षमतेला वाव देणे आवश्यक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले.
शिक्षकांचा सन्मान आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणे ही शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद शिक्षकांचा गुणगौरव होत असताना आश्रमशाळा शिक्षकांना आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षक दिनीच काळ्या फिती लावून निषेध नोंदवावा लागल्याने आदिवासी विकास विभागातील शिक्षकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.




Petrol Price




