रक्तदानाची अठरावी इनिंग : धीरज हाडगे यांचा समाजसेवेचा आदर्श


- देऊळगावच्या धीरज हाडगे यांचे १८वे रक्तदान; स्वयं रक्तदाता जिल्हा समितीचे सहकारी सदस्य
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि समाजात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या सामाजिक भावनेतून आरमोरी तालुक्यातील देऊळगाव येथील धीरज कृष्णा हाडगे यांनी आज आपल्या आयुष्यातील १८ वे रक्तदान केले.
रक्तपेढी, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे त्यांनी आज रक्तदान केले. धीरज हाडगे हे स्वयं रक्तदाता जिल्हा समितीचे सहकारी सदस्य असून रक्तदानाच्या सामाजिक कार्यात ते सातत्याने सक्रिय सहभाग घेत आहेत.
गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्वयं रक्तदाता जिल्हा समितीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. या कार्यात धीरज हेडगे यांचा सातत्यपूर्ण सहभाग उल्लेखनीय आहे. त्यांनी आतापर्यंत १८ वेळा रक्तदान करून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी रक्तदान करताना त्यांनी रक्तदानामुळे एखाद्या गरजू रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होत असेल, तर त्यापेक्षा मोठे समाधान नाही. निरोगी नागरिकांनी नियमित रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन केले.
धीरज हाडगे यांच्या १८व्या रक्तदानाबद्दल आकाश आंबोरकर आणि स्वयं रक्तदाता जिल्हा समितीच्या सहकाऱ्यांसह मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांचे हे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी असून, रक्तदान करा, जीवन वाचवा हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
रक्तदान करा… जीवन वाचवा! रक्तदान हेच श्रेष्ठदान!




Petrol Price




