सवलतीच्या प्रवाशांसाठी एसटीचे महत्त्वाचे पाऊल : NCMC कार्ड प्रक्रियेत बदल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) NCMC कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांसाठी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. सवलतीच्या प्रवासाचा लाभ अधिक सुलभपणे मिळावा यासाठी महामंडळाने नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
बायोमेट्रिक प्रमाणीकरणावेळी बोटांचे ठसे जुळत नसलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांना आता आधारकार्डशी संलग्न भ्रमणध्वनी क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या OTPच्या माध्यमातून NCMC कार्डची नोंदणी करता येणार आहे. ही सुविधा २१ सप्टेंबर २०२६ पासून उपलब्ध होणार आहे.दरम्यान, हरवलेले अथवा चोरीला गेलेले NCMC कार्ड ब्लॉक करून १९९ रुपये शुल्क भरून नवीन कार्डासाठी नोंदणी करण्याची सुविधाही २१ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.
१९ सप्टेंबरपर्यंत NCMC कार्डसाठी नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना २५ सप्टेंबर २०२६ पासून कार्ड वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, १६ सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांना QR कोड असलेली पावती देण्यात येत आहे.
ही QR कोड पावती एसटीच्या ईटीआयएम मशीनवर स्कॅन केल्यानंतर संबंधित सवलतधारकाला सवलतीचे तिकीट मिळणार आहे. नोंदणीची ही पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार आहे. या कालावधीत लाभार्थ्यांनी NCMC कार्ड Active करून त्यामध्ये Top-up करणे आवश्यक आहे.
सवलतीच्या प्रवासात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सर्व संबंधित सवलतधारकांनी तातडीने NCMC कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. NCMC कार्डच्या माध्यमातून सवलतीच्या प्रवासाची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.




Petrol Price




