महत्वाच्या बातम्या

 ग्रामीण रस्ते, तीर्थ व यात्रास्थळांची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करा : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर


- विविध विकास कामे व ग्रामीण रस्त्यांचा आढावा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा नियोजन समिती मधून मंजूर विविध ग्रामीण रस्ते, तीर्थक्षेत्र, यात्रास्थळांची कामे विहित कालावधीत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावी. यासाठी बांधकाम विभागाच्या संबंधित अभियंत्यावर जबाबदारी निश्चित करावी, अशा सुचना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सन२०२५-२०२६ मधील विविध विकास कामे, ग्रामीण रस्ते, तीर्थक्षेत्र व यात्रास्थळाच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत केल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयात इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण, ग्रामीण रस्ते विकास व मजबुतकीरण आणि क वर्ग तीर्थक्षेत्र व यात्रास्थळ विकास कार्यक्रमाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार, सुनील गफाट, बांधकाम विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आदी उपस्थित होते.

विविध बांधकामे हाती घेतांना लोकप्रतिनिधींनी शिफारस केलेल्या कामांना प्राधान्य देऊन अशा कामांचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा. बांधकामे सुरु असतांना अधिका-यांनी कामांची पाहणी करुन गुणवत्ता चांगली असल्याची खात्री करावी. शाळा, अंगणवाडीच्या कामांमध्ये प्रथम वाटर रुफींग व कलरींगच्या कामाला प्राधान्य द्यावे, अशा सुचनाही यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केल्या.

सन २०२५-२०२६ मध्ये इतर जिल्हा मार्ग रस्ते विकास व मजबुतीकरणाची ५८ कामे हाती घेण्यात आली असून ३० कामे पूर्ण झाली आहे. तर ९ कामे प्रगतीपथावर असून १७ कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. दोन कामांचा करारनामा करण्यात आला आहे. ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण अंतर्गत ११९ कामे हाती घेण्यात आली असून ३१ कामे पूर्ण झालेली आहे. यापैकी ४९ कामे प्रगतीपथावर असून २९ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. तर ९ कामांचा करारनामा करण्यात आला असून १ काम निविदा स्तरावर आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत क वर्ग तीर्थक्षेत्र, यात्रास्थळ विकास कार्यक्रमांतर्गत ३७ कामे हाती घेण्यात आली असून २ कामे पूर्ण झालेली आहे. यातील १२ कामे प्रगतीत असून ११ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहेत तर ११ कामांचा करार करण्यात आला आहे. एक काम निविदा स्तरावर असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. 





  Print






Related Photos