सेवा पंधरवाडा शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद विविध सेवांचा नागरिकांनी घेतला लाभ
- दिव्यांगांना ७,४८,०००/- निधी धनादेशाद्वारे वितरीत १९ बचत गटांना ४० लाखांचे कर्ज मंजुर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महानगरपालिकेतर्फे २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान आयोजित सेवा शिबीरास मोठा प्रतिसाद मिळुन अंदाजे २५०० नागरिकांनी शिबिरात सहभाग दर्शविला.
या सेवा शिबिरांमध्ये नाव दाखल खारीज आदेश, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, रेन वॉटर हार्वेस्टींग प्रमाणपत्र व अनुदान धनादेश वाटप, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, भोगवटादार प्रमाणपत्र, बांधकाम मंजुरी, नविन नळ जोडणी, बचत गटांना नोंदणी प्रमाणपत्रे व कर्ज मंजुरी वाटप, दिव्यांगांना ओळखपत्रे, दारिद्रय रेषेखालील नागरीकांना बीपीएल प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
शिबिरांतर्गत ३० दिव्यांग व्यक्तींना ओळखपत्र तर दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत ७४ दिव्यांग व्यक्तींना एकुण रुपये ७,४८,०००/- निधी धनादेशाद्वारे वितरीत करण्यात आला. १९ बचत गटांना ४० लक्ष रुपयांचे कर्ज शिबिरांत मंजुर करण्यात आले तर २५ बचत गटांना नोंदणी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. सेवा शिबिरांचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर व्यायामशाळा, डॉ. धांडे हॉस्पीटल जवळ, तुकुम, आझाद बगीचा व मनपा झोन ३ कार्यालय परिसरात अनुक्रमे २७,२८ व २९ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते.
अपेक्षित कालावधीत नागरिकांना सेवा पुरविण्यासाठी कटिबध्दता राखत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची अंमलबजावणी विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरु आहे. यामधील प्रलंबित अर्जांचा निपटारा त्वरित व्हावा यादृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा जाहीर करण्यात आलेला आहे. याअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मनपाच्या तीनही झोनमध्ये झोन सहायक आयुक्तांद्वारे सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरांच्या यशस्वीतेसाठी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त अशोक गराटे, शहर अभियंता महेश बारई, सहायक आयुक्त विद्या पाटील, सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे, सहायक आयुक्त सचिन माकोडे, सहायक आयुक्त राहुल पंचबुद्धे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, वैद्यकीय अधिकारी ( स्वच्छता) डॉ. अमोल शेळके यांनी परिश्रम घेतले.
News - Chandrapur