महत्वाच्या बातम्या

 चुनाळा येथे चितळाचे मांस शिजवताना तिघांना अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा वनपरिक्षेत्रांतर्गत चुनाळा नियत वनक्षेत्रात नर चितळाची शिकार करून त्याच्या मांसाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजुरा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी धाड टाकून चितळाचे मांस शिजवताना तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत चार किलो शिजवलेले आणि १५ किलो कच्चे मांस, तसेच शिकार करण्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहे.

राजुरा शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चुनाळा शिवारात चितळाची शिकार करून त्याच्या मांसाची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाड टाकली. त्यावेळी चितळाचे मांस शिजविले जात असल्याचे, तर उर्वरित मांस विक्रीच्या उद्देशाने तुकडे करून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.

वनविभागाच्या पथकाने घटनास्थळावरून पिंटू गणपती राधी (वय ५०), सुरेश चिलमवार आणि रायमलू लिंगमवार, तिघेही रा. चुनाळा, यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान या शिकारीशी संबंधित चार किलो शिजवलेले आणि १५ किलो कच्चे मांस आढळून आले. वनकर्मचाऱ्यांनी हे मांस आणि कुऱ्हाड जप्त केली. याप्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई उपविभागीय वनाधिकारी मंगेश गिरडकर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहायक संजय गरमडे, वनरक्षक अंकिता नेवारे, गीता चव्हाण, मीनाक्षी सातपुते, तानाजी कामले, भोजराज दांडेकर, पवन मांदुलवार, मारोती चापले तसेच वनमजूर गंगाधर मोहितकर, संतोष किनाके, बलदेव मेश्राम, नरेश निखाडे आणि गंगाधर सोपनकर यांनी केले.





  Print






Related Photos