महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूरच्या प्रियदर्शनी इंदिरा चौकात पुरुषाचे कापलेले शीर : रेल्वे उड्डाणपुलाखाली धड आढळल्याने शहरात खळबळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहराच्या मध्यवर्ती आणि अतिव्यस्त प्रियदर्शनी इंदिरा चौक परिसरात पुरुषाचे कापलेले शीर आढळून आल्याने संपूर्ण चंद्रपूर शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील गजबजलेल्या भागात मानवी शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, प्रियदर्शनी इंदिरा चौक परिसरात एका पुरुषाचे कापलेले शीर आढळून आले, तर रेल्वे उड्डाणपुलाखाली जाहिरातींच्या फलकाजवळ त्याचे धड आढळल्याची माहिती समोर आली आहे. एकाच व्यक्तीच्या शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याने हा प्रकार अत्यंत गंभीर आणि संशयास्पद मानला जात आहे.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून तपासाला सुरुवात केली. दरम्यान, श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. कापलेले शीर श्वान पथकाला सुगावा घेण्यासाठी देण्यात आल्यानंतर श्वानाने रेल्वे उड्डाणपुलाच्या दिशेने मार्गक्रमण केल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मृत व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसून, हा प्रकार नेमका कसा घडला, मृतदेहाचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी कोणी आणि कोणत्या उद्देशाने टाकले, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली आहे का, याचाही तपास पोलीस करीत आहेत. चंद्रपूरच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या अमानुष व थरारक घटनेने शहर हादरले आहे. पोलीस तपासातून मृत व्यक्तीची ओळख आणि या घटनेमागील नेमके सत्य काय समोर येते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.





  Print






Related Photos