सेवा संकल्प अभियानांतर्गत डीईआयसी जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे २४ बालकांवर विविध दंत लघुशस्त्रक्रिया यशस्वी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथील जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) येथे ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांच्या विविध दंत आरोग्य समस्यांवर उपचाराच्या अनुषंगाने एकूण २४ लघुशस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या.
गडचिरोली जिल्ह्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे द्वितीयस्तरीय संदर्भसेवा कक्ष म्हणून DEIC कार्यरत आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांमध्ये बालकांच्या दातांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येते. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या आवश्यक उपचारांच्या प्रकरणांमध्ये बालकांना पुढील तपासणी व उपचार व शस्त्रक्रियासाठी डीईआयसी येथे संदर्भित करण्यात येते.
DEIC येथे संदर्भित बालकांची तज्ज्ञांकडून आवश्यक तपासणी करून निदान निश्चित केलं जाते व समस्येनुसार पुढील उपचार व शस्त्रक्रियेसाठी नियोजन करण्यात येते. त्यानुसार सेवा संकल्प अभियानांतर्गत आज विविध आरोग्य समस्यांशी संबंधित २४ लघुशस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या.
या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यातील गरजू बालकांना त्यांच्या जिल्ह्यातच आवश्यक द्वितीयस्तरीय आरोग्यसेवा उपलब्ध होत असून, त्यांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होत आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) व जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) यांच्या माध्यमातून बालकांच्या आरोग्यविषयक समस्यांचे वेळेवर निदान, संदर्भसेवा आणि आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.




Petrol Price




