महत्वाच्या बातम्या

 अनुचित घटना टाळण्यासाठी काटेकोर नियोजन करा - पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे निर्देश


- धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
- अनुयायांच्या मदतीसाठी १८००१२३००६१ हा हेल्पलाईन क्रमांक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : दीक्षाभूमी येथे आयोजित ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या कालावधीत कोणतीही चोरी किंवा अनुचित घटना घडू नये, यासाठी काटेकोर नियोजन करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी. अनुयायांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत बंदोबस्ताचे सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले.

दीक्षाभूमी येथे ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याच्या आयोजनाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस उपायुक्त ए. ऋषिकेश रेड्डी, पोलीस उपायुक्त संदीप पखाले, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे तसेच विविध समित्यांचे प्रमुख उपस्थित होते.

पोलीस यंत्रणेने शास्त्रशुद्ध पद्धतीने बंदोबस्ताचे नियोजन करावे. वाहतूक व्यवस्थापनासाठी योग्य नियोजन करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात. प्रत्येक सेक्टरमध्ये पोलीस उपनिरीक्षकांची नियुक्ती करावी. उपलब्ध मनुष्यबळाचा प्रभावी वापर करून अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी दिले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी येणाऱ्या अनुयायांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नाचा दर्जा उत्कृष्ट असावा. अन्नातून विषबाधा होण्यासारख्या घटना घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी. विविध विभागांमध्ये संपर्क, समन्वय आणि संवाद कायम ठेवणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केल

समन्वयाने काम करण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश -
विविध उपसमित्यांच्या प्रमुखांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे आणि सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. अनुयायांच्या सोईसाठी समता सैनिक दलासह विद्यार्थ्यांचेही सहकार्य घ्यावे, असे त्यांनी सांगितले.

आरोग्य, विद्युत व आपत्ती व्यवस्थापनावर भर - जिल्हाधिकारी
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कालावधीत दीक्षाभूमी परिसरातील आरोग्य सेवा, विद्युत व्यवस्था आणि हेल्पलाईन यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत ठेवावी. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथकांच्या व्यवस्थेचेही नियोजन करावे. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

तक्रार निवारणासह हरविलेल्या व्यक्तींसाठी स्वतंत्र कक्ष -
सोहळ्यादरम्यान मोठ्या संख्येने अनुयायी दीक्षाभूमी परिसरात दाखल होणार असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. तक्रार निवारण कक्षासह हरविलेल्या व्यक्ती व बालकांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहे. तसेच अनुयायांना सापडलेल्या वस्तू जमा करण्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळविण्यासाठी १८००१२३००६१ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे.

बैठकीत समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी विविध समित्यांच्या कामकाजाच्या प्रगतीचा आढावा सादरीकरणाद्वारे मांडला. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचे सादरीकरण केले.





  Print






Related Photos