महत्वाच्या बातम्या

 प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील सुरक्षारक्षक भरतीच्या अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन


- राज्य शासन किंवा जिल्हा परिषदेमार्फत सध्या कोणतीही अधिकृत सुरक्षारक्षक भरती प्रक्रिया सुरू नाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस   
प्रतिनिधी/  भंडारा : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सुरक्षारक्षक पदांची भरती करण्यात येत असल्याच्या अफवा तसेच विविध माध्यमातून नागरिकांची दिशाभूल करणारे संदेश प्रसारित होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर राज्य शासन किंवा जिल्हा परिषद, भंडारा यांच्यामार्फत सध्या कोणत्याही प्रकारची सुरक्षारक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येत नाही. त्यामुळे सुरक्षारक्षक पदासाठी अर्ज, नोंदणी, कागदपत्र पडताळणी किंवा नियुक्तीच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीने पैसे मागितल्यास अथवा वैयक्तिक माहिती मागितल्यास नागरिकांनी सावध राहावे.

सोशल मीडिया, व्हॉट्सॲप ग्रुप किंवा इतर माध्यमातून प्राप्त होणाऱ्या भरतीच्या जाहिराती, लिंक, अर्ज अथवा संदेशांची सत्यता तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये. अशा संदेशांमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शासकीय भरतीबाबतची अधिकृत माहिती केवळ संबंधित शासन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर, अधिकृत जाहिरातीत किंवा सक्षम प्राधिकरणामार्फत प्रसिद्ध करण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी अनधिकृत व्यक्ती, एजंट किंवा मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये.अधिकृत माहितीची खात्री करा, अफवांपासून सावध राहा आणि आर्थिक फसवणूक टाळा, असे आवाहन आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.





  Print






Related Photos