लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू : कवराम येथे आरोग्य यंत्रणेत खळबळ


- लसीकरणानंतरची प्रतिकूल घटना म्हणून नोंद; जिल्हास्तरीय तज्ज्ञ समितीकडून सखोल चौकशी सुरू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील कवराम येथे नियमित लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बालकाची प्रकृती अचानक खालावून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली असून, प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. लसीकरणानंतर घडलेली प्रतिकूल घटना (Adverse Event Following Immunization - AEFI) म्हणून या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. मात्र, बालकाच्या मृत्यूचा संबंध लसीकरणाशी थेट आहे की अन्य कोणत्या वैद्यकीय कारणामुळे मृत्यू झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी जिल्हास्तरीय तज्ज्ञ समितीमार्फत सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. अंतिम चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) डॉ. प्रताप शिंदे यांनी दिली.
नियमित लसीकरणानंतर प्रकृती खालावली -
कवराम येथील सुनीता शामराव तलांडी यांच्या दोन महिन्यांच्या बालकाला प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत आयोजित नियमित लसीकरण सत्रात नियमानुसार लसीचे डोस देण्यात आले. लसीकरणानंतर काही कालावधीत बालकाची प्रकृती खालावली. त्यानंतर बालकाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली.
घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाने तत्काळ दखल घेत जिल्हास्तरीय तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी सुरू केली. या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी विविध बाबींची तपासणी केली जात आहे.
लसींची साठवणूक, बॅच आणि शीतसाखळीची तपासणी -
चौकशी समितीने घटनास्थळी भेट देऊन लसीकरणाशी संबंधित विविध बाबींची पाहणी केली. यामध्ये लसींची योग्य पद्धतीने साठवणूक करण्यात आली होती का, शीतसाखळी व्यवस्था सुरळीत होती का, वापरण्यात आलेल्या लसीची बॅच कोणती होती, लसीकरणाची प्रक्रिया नियमानुसार पार पडली का, याची तपासणी करण्यात आली.
याशिवाय संबंधित लसीकरण सत्रातील नोंदी, लसींची उपलब्धता व हाताळणी, लसीकरणासाठी वापरण्यात आलेली सामग्री तसेच संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांकडून पार पाडण्यात आलेल्या प्रक्रियेचीही पडताळणी केली जात आहे.
बालकाच्या वैद्यकीय पार्श्वभूमीचीही तपासणी -
मृत्यूचे कारण निश्चित करण्यासाठी केवळ लसीकरणाशी संबंधित बाबींचीच नव्हे, तर बालकाच्या वैद्यकीय पार्श्वभूमीचीही तपासणी केली जात आहे. बालकाची पूर्वीची प्रकृती, आजारपणाचा इतिहास, लसीकरणापूर्वीची स्थिती आणि लसीकरणानंतर झालेल्या प्रकृतीतील बदल याबाबतची माहिती समितीकडून संकलित केली जात आहे.
घटनेतील सर्व वैद्यकीय आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास केल्यानंतर समिती आपला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतरच बालकाच्या मृत्यूमागील नेमके कारण आणि लसीकरणाशी त्याचा काही संबंध आहे किंवा नाही, याबाबत अधिकृत निष्कर्ष समोर येणार आहे.
अंतिम अहवालानंतरच कारण स्पष्ट होणार -
या घटनेकडे आरोग्य विभाग गांभीर्याने पाहत असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. या घटनेची लसीकरणानंतरची प्रतिकूल घटना म्हणून नोंद करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय तज्ज्ञ समितीमार्फत सखोल चौकशी सुरू असून, अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे डीएचओ डॉ. प्रताप शिंदे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, चौकशी समितीच्या अहवालाकडे लक्ष लागले असून, या अहवालातून बालकाच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते, तसेच लसीकरण आणि मृत्यू यांच्यात काही वैद्यकीय संबंध होता का, याबाबत स्पष्टता मिळण्याची अपेक्षा आहे.




Petrol Price




