महत्वाच्या बातम्या

 युवकांनी शिक्षणाला प्राधान्य देत व्यसनांपासून दूर राहावे : आमदार डॉ. मिलिंद नरोटे


- फोकुर्डी येथे भव्य दिवस-रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन; खेळातून शिस्त, संघभावना आणि खिलाडूवृत्ती जोपासण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी (फोकुर्डी) : युवकांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन व्यसनांपासून दूर राहावे. शिक्षणासोबतच शारीरिक आणि मानसिक विकासासाठी क्रीडा क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले.

शिवभक्त क्रीडा मंडळ, फोकुर्डी यांच्या सौजन्याने आयोजित भव्य दिवस-रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित खेळाडू आणि युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी आमदार डॉ. नरोटे म्हणाले की, युवकांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या भविष्याचा भक्कम पाया तयार करावा. आजच्या काळात शिक्षण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक सक्षमता टिकविण्यासाठी खेळांनाही महत्त्व आहे. कबड्डीसारख्या मैदानी खेळांमुळे खेळाडूंमध्ये शिस्त, संघभावना, जिद्द, आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्ती निर्माण होते. ग्रामीण भागातील युवकांमध्येही क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपले कौशल्य सिद्ध करावे आणि गावासह जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, असे त्यांनी सांगितले.

तसेच युवकांनी वाईट सवयी आणि व्यसनांपासून दूर राहून आपली ऊर्जा शिक्षण, क्रीडा आणि समाजोपयोगी उपक्रमांसाठी खर्च करावी. क्रीडा स्पर्धा या केवळ विजय-पराजयापुरत्या मर्यादित नसून त्यातून परस्पर सहकार्य, खिलाडूवृत्ती आणि सामाजिक एकोपा वाढीस लागतो, असेही त्यांनी नमूद केले.

या उद्घाटनप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे, ज्येष्ठ नेते श्रावणजी सोनटक्के, माजी सरपंच परशुरामजी तुंबडे, माजी उपसरपंच कैलासजी घोगरे, माजी सरपंच रूपाली दहलकर, राजू पाटील पोटे, नरेंद्र फाले, तुमदेव झाडे, बंडूजी दहलकर, एकनाथ झाडे, नथुजी गोवणे, मुरलीधर निमडर, लोमेश झाडे, शंकर झाडे, हरिश माकडे, प्रशांत कोटगले आणि सतीश पेंदोरकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेमुळे फोकुर्डी परिसरातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.





  Print






Related Photos