निवृत्तीवेतन धारकांसाठी मोबाईल ॲपद्वारे हयात प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा निवृत्तीवेतन धारकांसाठी महामेळावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : निवृत्तीवेतनधारकांचे जीवन अधिक सुलभ व सुकर व्हावे यासाठी चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांना सहजगत्या डिजिटल हयात प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा निर्माण झाली आहे. निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या प्रक्रियेचा लाभ घ्यावा व आपले हयात प्रमाणपत्र वेळेत प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन भारत सरकारच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे संचालक प्रमोद कुमार कौशिक यांनी आज येथे केले. राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियानांतर्गत नियोजन भवन येथे विशेष महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
वरिष्ठ कोषागार कार्यालयातर्फे आयोजित महामेळाव्यास लेखा व कोषागारे सहसंचालक ज्योती भोंडे, वरिष्ठ कोषागार अधिकारी अमित मेश्राम, कुशावर अधिकारी मोनाली भोयर, अपर कोषागार अधिकारी शुभांगी धुर्वे यांच्यासह उपमहालेखापाल नागराजन, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्राचे उपमहाव्यवस्थापक शशी रंजन, अरूप पात्रा व अनंत कुमार गाडे उपस्थित होते. कौशिक म्हणाले, हे अभियान केवळ प्रमाणपत्र जमा करण्यापुरते मर्यादित नसून या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांमध्ये डिजिटल सुविधांविषयी जागरूकता निर्माण करण्यात येत आहे.
या सुविधांचा प्रत्यक्ष वापर त्यांना करता यावा हा या अभियानाचा उद्देश असून विशेषतः जेष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती तसेच शारीरिक दृष्ट्या असमर्थ्य निवृत्तीवेतनधारकांना आवश्यक ती मदत यामुळे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कौशिक यांनी निवृत्तीवेतनधारकांना मोबाईल ॲपद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करताना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. निवृत्तीवेतनधारकांशी संवाद साधत त्यांनी मार्गदर्शन केले. या महामेळाव्यात सहभागी झालेले निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे ऑनलाइन हयात प्रमाणपत्र तयार करून देण्यात आले.
चेहरा प्रमाणीकरणाच्या सुविधेद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, याबाबत जिल्हा कोषागार कार्यालयाकडून या प्रक्रियेबाबत सादरीकरण व मार्गदर्शन करण्यात आले. डिसेंबर-२०२६ चे निवृत्तीवेतनाची प्रक्रिया पार पडण्यासाठी ऑनलाइन हयात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याने हा महामेळावा महत्वाचा ठरला असून सर्व पात्र निवृत्तीवेतनधारकांनी या सुविधेचा लाभ घेतला. यावेळी कोषागारातील वरिष्ठ अधिकारी, बँक प्रतिनिधी, निवृत्तीवेतनधारक संघटनांचे पदाधिकारी व निवृत्तीवेतनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




